नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: क्रिकेट विश्वातील परंपरागत शत्रू मानले जाणाऱ्या भारत आणि पाकिस्तान दरम्यान आज झालेल्या क्रिकेट सामन्यावर बुकी बाजारात आतापर्यंतचा रेकॉर्ड ब्रेक सट्टा लागला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आजच्या सामन्यावर ४० ते ४५ हजार कोटींचा सट्टा लागला असून, एकट्या विदर्भ तसेच मध्य भारतातून बुकींनी ३ हजारांवर कोटींच्या सट्ट्याची खयवाडी लगवाडी केल्याचे वृत्त आहे. एका मॅचवर एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच सट्टा लागल्याचे बुकींचे मत आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्याचा हंगाम बुकी बाजारासाठी दिवाळीचे पर्व असते. एकेका सामन्यावर नव्हे एकेका चेंडूवर बुकीबाजारात कोट्यवधींची खयवाडी होते. त्यात विश्वचषकासाठी होणारा भारत-पाकिस्तान संघातील क्रिकेट सामना बुकी बाजारासाठी हजारो कोटींच्या उलाढालीचा 'डाव' ठरतो. केवळ या दोन देशात नव्हे तर जागतिक बुकी बाजारात सर्वाधिक सट्टा या दोन संघादरम्यान खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट सामन्यावर लागतो. शनिवारी १४ ऑक्टोबरला नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये भारत-पाक संघ भिडणार असल्याचे आधीच जाहिर झाल्याने बुकींनी पूर्वतयारी करून ठेवली होती. एकाच दिवशी कोट्यवधींचे वारे-न्यारे होत असताना कारवाईचे बालंट नको म्हणून बड्या बुकींनी यावेळी क्रिकेट सट्ट्याच्या अड्ड्याचे मुख्यालय दुबईत ठेवले. विशेष म्हणजे, क्रिकेटच्या सट्ट्याचे मध्य भारतातील सर्वात मोठे केंद्र म्हणून नागपूरची चर्चा होते. येथील बुकी विश्वचषकाच्या हंगामात हजारो कोटींची खयवाडी लगवाडी करतात. मात्र, यावेळी नागपुरातील बहुतांश बड्या बुकींनी खयवाडीसाठी गोव्यात हेडक्वॉर्टर बनविले आणि तेथूनच खयवाडी केली.
कुणी हॉटेल तर कुणी फ्लॅटमध्ये
नागपूर-विदर्भातील ८० टक्के बडे बुकींनी आज गोव्यातून खयवाडी केली. कुण्या बुकीने आपल्या पंटर्सला गोवा, पणजीतील हॉटेलमध्ये, कुणी फार्म हाऊस तर कुणी भाड्याच्या आलिशान फ्लॅटमध्ये बसवून अड्डे चालविल्याचे संबंधित सूत्रांचे सांगणे आहे. विश्वचषकात ही मंडळी तेथूनच रोज शेकडो कोटींची खयवाडी करणार आहे.
सर्व कटिंग दुबईतच
सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूरसह मध्य भारतातील निवडक बुकींचा अपवाद वगळता ईतर सर्व बुकी गोव्यातून खयवाडी करीत असले तरी ते दुबईतच कटिंग करतात. अर्थात् घेतलेल्या सट्ट्याची पलटी (उतारी) दुबईतच होते.
बुकींचे भाकित पाकिस्तानच्या विरोधातच
आजच्या सामन्यात भारतासमोर पाकिस्तान टिकणार नाही, असे भाकित बुकींनी वर्तविले होते. त्यामुळे मॅचमध्ये प्रारंभी पासून बुकींनी ४६-५० आणि ४८-५० असाच सामन्याचा रेट दिला होता. अर्थात भारत जिंकण्याचा दावा करणाऱ्या सटोड्यांना १०० रुपये लावल्यास ४६ (नंतर ४८ रुपये) मिळतील आणि पाकिस्तान जिंकण्याचा दावा करणाऱ्या सटोड्यांना १०० रुपये लावल्यास दोनशे रुपये मिळतील, असे जाहिर केले होते. मात्र मध्यंतरी काही वेळेसाठी हा रेट ७९ -८१ वर पोहचला होता.