नागपूर : यंदा मुसळधार पावसामुळे सोयाबीनचे पीक खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच व्यापारी आणि शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेल्या सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळत आहे. भाव जास्त मिळत असल्याने अनेक जण कळमना बाजारात सोयाबीन विक्रीसाठी आणत असून, शनिवारी रेकॉर्डब्रेक भावात अर्थात ८ हजार रुपये क्विंटलने सोयाबीनची विक्री झाली. भाववाढीसाठी कमी आवक कारणीभूत असल्याचे अडत्यांनी सांगितले.
सणांमुळे खाद्यतेलाची मागणी वाढली
बाजारात सोयाबीनचा भाव वाढला असला तरीही सध्या कळमना बाजारात केवळ ४०० ते ५०० क्विंटल पोत्यांचीच आवक आहे. त्यात व्यापारी जास्त माल आणत आहेत. कळमना धान्य बाजाराचे अध्यक्ष अतुल सेनाड म्हणाले, विदेशी बाजारात मंदी आहे; पण देशात सणांमुळे मागणी वाढल्याने खाद्यतेल आणि तेलबियांच्या बाजारात सोयाबीनचा भाव रेकॉर्ड स्तरावर पोहोचला आहे. याशिवाय कमी आवक असल्याने भाववाढ झाली आहे. यावर्षी खरीप हंगामाचे सोयाबीन दसऱ्यानंतर बाजारात येणार आहे. यावर्षी सोयाबीनची जास्त लागवड झाली आहे. सध्या पीक चांगले आहे; पण यंदा पावसाच्या अनिश्चिततेमुळे पिकावर संकटच आहे. गेल्या वर्षी काढणीच्या वेळी पाऊस मोठ्या प्रमाणात आल्याने सोयाबीन पिकाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता. त्यामुळे उत्पन्नात ५० टक्क्यांची घट झाली होती. त्याच कारणाने खाद्यतेलाचे भावही वाढले होते. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदा तशीच परिस्थिती ओढवू नये, असे सेनाड यांनी स्पष्ट केले.
सरकारने तेलबियांच्या उत्पादनावर भर द्यावा
यंदा सोयाबीनच्या तुलनेत कापसाची लागवड कमी झाली आहे. गेल्या वर्षी सोयाबीनला जास्त भाव मिळाल्याने सोयाबीनची लागवड वाढली आहे. याशिवाय यंदा सोयाबीनचे बियाणे महाग झाल्याने शेतकऱ्यांची गुंतवणूक वाढली आहे. सेनाड म्हणाले, लातूर आणि नांदेड येथील सोयाबीन तेलनिर्मिती प्रकल्प संचालकांनी सोयाबीन ८,४५० ते ८,७०० रुपये क्विंटल खरेदी केले आहे. हा एक रेकॉर्डच आहे. वाढते दर पाहून शेतकऱ्यांनी सोयाबीनची जास्त पेरणी करावी. सरकारने खाद्यतेलाचे आयात शुल्क कमी करण्याऐवजी तेलबियांच्या उत्पादन वाढीवर भर द्यावा आणि आयातीसाठी विदेशी बाजारावर अवलंबून राहू नये. एवढेच नव्हे तर पामोलिनच्या आयातीवर नियंत्रण आणावे, अन्यथा घरगुती रिफायनरी कंपन्या संकटात येतील.