नागपूर : सन उत्सवाचा महिना म्हणून ओळखल्या जाणारा सप्टेंबर महिना रेल्वेच्या नागपूर विभागाला चांगलाच पावला. या अवघ्या एका महिन्यात रेल्वेने आतापर्यंतचे कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडले. गेल्या सप्टेंबर महिन्यात रेल्वेने मालवाहतुकीतून ३०१.९३ कोटी रुपयांची कमाई केली.
गेल्या ऑगस्ट महिन्यात रेल्वेने २५०.७८ कोटी रुपयांची कमाई केली होती. त्या तुलनेत सप्टेंबरची कमाई २० टक्के जास्त आहे. सुरू असलेल्या वित्तीय वर्षात एप्रिल ते सप्टेंबर २०२३ मध्ये रेल्वेने आतापर्यंत मालवाहतुकीतून २४६८.५६ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवले आहे. गेल्या वर्षी या अवधीत रेल्वेने २०५५.३३ कोटी रुपयांची कमाई केली होती. सध्याची कमाई त्या तुलनेत सुमारे २० टक्के जास्त आहे. विशेष म्हणजे, रेल्वेची या सप्टेंबर महिन्यातील कमाई आतापर्यंतचे सर्व रेकॉर्ड मोडणारी आहे.
२०२१ चा रेकॉर्ड तोडला
२०२१ च्या सप्टेंबर महिन्यात नागपूरच्या रेल्वे विभागाने मालवाहतुकीतून २६५.३ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळवून एक नवा रेकॉर्ड बनविला होता. तो यावर्षीच्या सप्टेंबर महिन्याने तोडला आहे.