नागपूर : नागपूर मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक अनुपकुमार कुमरे यांच्या सेवा पुस्तकामध्ये त्यांच्याविरुद्ध झालेल्या अवमानना कारवाईची नोंद करा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकारला दिला.
या प्रकरणात न्यायालयाने कुमरे यांनी मागितलेली माफी स्वीकारली. परंतु, न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करण्याची कृती त्यांच्याकडून दोनदा घडल्यामुळे न्यायालयाने त्यांना कोणतीही कारवाई न करता सोडण्यास नकार देत हा आदेश दिला. प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. गेल्या २ फेब्रुवारी रोजी न्यायालयाने फसवणूक प्रकरणामध्ये रविशंकर लोंधेकर यांना जामिनावर सोडण्याचा आदेश दिला होता. परंतु, कुमरे यांनी सायंकाळी ५ वाजतानंतर आरोपीला सोडता येत नसल्याचे सांगून आदेशाचे पालन केले नाही. त्यांनी आदेशाचे उल्लंघन केल्याचे पुराव्यांवरून आढळून आल्यामुळे न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध स्वत:च अवमानना याचिका दाखल केली होती. ती याचिका संबंधित आदेश देऊन निकाली काढण्यात आली. उच्च न्यायालयातर्फे ॲड. फिरदोस मिर्झा यांनी कामकाज पाहिले.