लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोना संसर्गाच्या सुरुवातीच्या काळाच्या तुलनेत अनलॉक दरम्यान विजेची मागणी वाढली आहे. वीज कंपन्यानी पूर्वीप्रमाणे विजेचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान महाजेनकोच्या खापरखेडा व परळी वीज केंद्राने रेकॉर्ड उत्पादन करण्यात यश प्राप्त केले आहे.परळी औष्णिक वीज केंद्रात २५०-२५० मेगावॉट क्षमतेच्या युनिट क्रमांक ६, ७ व ८ ने ७३२ मेगावॉटचे उत्पादन केले. येथे ९८ टक्के प्लांट लोड फॅक्टर (क्षमतेप्रमाणे उत्पादन) केले आहे. हा एक रेकॉर्ड आहे. त्याचप्रकारे नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा औष्णिक वीज केंद्राच्या युनिट क्रमांक ४ मध्ये गेल्या १०० दिवसात सलगपणे विजेचे उत्पादन सुरु आहे. याच केंद्राच्या ५०० मेगावॉट क्षमतेची युनिट क्रमांक ५ गेल्या ९६ दिवसात विजेचे उत्पादन करीत आहे. महाजेनकेच्या व्यवस्थापकांनी दोन्ही वीज केंद्राच्या अभियंता व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.विशेष म्हणजे कोरोनाच्या काळात औद्योगिक व वाणिज्यिक विजेचा वापर जवळपास थांबला होता. केवळ घरगुती व कृषीसाठी विजेची मागणी होती. परिणामी जवळपास ६ हजार मेगावॉट मागणी कमी झाली होती. आता राज्यातील औद्योगिक व वाणिज्यिक कामे हळूहळू पूर्वपदावर येत आहे. यामुळे विजेची मागणी वाढत आहे. यामुळे महाजेनकोने औष्णिक वीज केंद्रातील उत्पादन वाढविले आहे.
खापरखेडा, परळी वीज केंद्रात रेकॉर्ड उत्पादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 08, 2020 11:07 PM