लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मनपाची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी वित्तवर्षात मालमत्ताकरातून ३३२ कोटींची वसुली करा तसेच थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे निर्देश स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर यांनी बुधवारी आढावा बैठकीत दिले.
आर्थिक वर्षातील करवसुली हा दैनंदिन कामाचा भाग आहे. करविभागातील निरीक्षकांनी थकबाकी वसूल केल्यास उद्दिष्ट पूर्ण होण्यास अडचण नाही. यासाठी थकबाकी वसुलीवर अधिक लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले.
कर व करआकारणी विभागाचे उपायुक्त मिलिंद मेश्राम, झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे, प्रकाश वऱ्हाडे, गणेश राठोड, हरीश राऊत, अशोक पाटील, सुषमा मांडगे, किरण बगडे, साधना पाटील, करविभागाचे करनिर्धारक व संग्राहक दिनकर उमरेडकर व कर अधीक्षक गौतम पाटील यांच्यासह सर्व झोनचे करनिरीक्षक उपस्थित होते.
बैठकीत झोननिहाय करवसुली, महिन्याचे उद्दिष्ट व वसुली याचा आढावा घेतला. अर्थसंकल्पात वित्तवर्षात मालमत्ताकरातून २५६ कोटी रुपये वसुलीचे उद्दिष्ट आहे. ते पूर्ण होण्यात अडचण नाही. परंतु, थकबाकी वसुली होणे गरजेचे आहे. यासाठी पुढील सात महिन्यांचे नियोजन करा. कोरोनामुळे मागील वर्षी करवसुलीवर त्याचा परिणाम झाला. यावर्षी मात्र अशी परिस्थिती नाही. आकडेवारी झोन सहायक आयुक्तांनी सादर करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
मागील पाच महिन्यांतील करवसुलीचा आढावा घेतला. विवादित मालमत्तांच्या करवसुलीमध्ये येणाऱ्या अडचणींवर चर्चा झाली.