नागपूर : एका औषध व्यापाऱ्याला मैत्रिणीसोबत फिरायला जाणे चांगलेच महागात पडले. तो ज्या कॅबमध्ये मैत्रिणीला घेऊन गेला होता, त्या कॅबचालकानेच त्याला ब्लॅकमेल करून वर्षभरात ६ लाख रुपयांची वसुली केली. त्यानंतर पुन्हा धमकावून ३ लाख रुपये मागत होता. पीडित व्यापाऱ्याच्या तक्रारीवर प्रतापनगर पोलिसांनी आरोपी कॅब चालक व त्याच्या मित्राला अटक केली. आरोपीचे नाव रोशन पुरुषोत्तम इंगळे (३०) रा. सुमन बुद्ध विहार, कामठी रोड व विकास मधुकर वाणी (३७) रा. मिसाळ ले-आऊट, मोठा इंदोरा आहे.
त्रिमूर्तीनगरात राहणारे आशिष जोशी यांचे प्रतापनगर येथे मेडिकल स्टोअर्स आहे. त्यांची कॅब चालक रोशन इंगळे याच्यासोबत जुनी ओळख आहे. जुलै २०१८ मध्ये आशिष मैत्रिणीसोबत रोशनच्या कॅबमध्ये पाटणसावंगीच्या लाहोरी रिसोर्टमध्ये गेला होता. काही वेळ तिथे घालविल्यानंतर दोघेही परत आले. परत येताना रोशनच्या कॅबमध्ये त्या रिसोर्टमध्ये केलेल्या पेमेंटची पावती सुटली. त्यावर आशिषचे नाव लिहिले होते. या पावतीच्या आधारे आशिषला ब्लॅकमेल करण्याची योजना रोशनने बनविली. त्याने काही महिन्यानंतर आशिषला फोन करून पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास घरच्यांना सर्व सांगेल, अशी धमकी दिली. त्याच्याजवळ रिसोर्टची पावती असल्याचे सांगितले. त्याच्या धमकीमुळे आशिष घाबरला, त्याला पैसे द्यायला तयार झाला.
रोशनने आशिषला धमकी देऊन फेब्रुवारी २०१९ मध्ये दीड लाख रुपये वसूल केले. एप्रिलमध्ये पुन्हा दोन लाख रुपये मागितले. त्यानंतर सप्टेंबर २०१९ मध्ये एक लाख रुपये घेतले. त्यानंतरही रोशनने धमकी देऊन पैसे मागणे सुरूच ठेवले. एप्रिल २०२० मध्ये आशिषने रोशनला दीड लाख रुपये दिले. असे ६ लाख रुपये देऊन आता ब्लॅकमेल करू नको म्हणून विनंतीही केली. पण काही दिवसानंतर रोशनने पुन्हा मेसेज करून ३ लाख रुपयांची मागणी केली. धमकीही द्यायला लागले. मात्र आशिषने त्याच्या धमकीला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे मंगळवारी दुपारी रोशन व त्याचा मित्र विकास वाणी याला घेऊन मेडिकल स्टोअर्समध्ये पोहचला. धमकी देऊन पैसे मागू लागला. आशिषने प्रतापनगर पोलिसांना सूचना केली. पोलिसांनी तत्काळ रोशन व विकासला ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध हप्ता वसुली प्रकरणी गुन्हा दाखल केला.