३३२ कोटीचे उद्दिष्ट : मनपाचा कर विभाग ॲक्शन मोडवर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वर्षानुवर्षे कराची थकबाकी असलेल्यांच्या मालमत्ता लिलावात काढण्याची धडक मोहीम महापालिकेच्या कर आकारणी व कर वसुली विभागाने हाती घेतली आहे. यात एका बंगल्यासह, काही भूखंड व घरांची विक्री करून कर वसुली करण्यात आली आहे.
लक्ष्मीनगर झोन कार्यक्षेत्रातील वृंदा दाऊ यांच्या बंगल्याची विक्री करून थकीत मालमत्ता कर वसूल करण्यात आला. हनुमान नगर कार्यक्षेत्रातील युनिक को-ऑपरेटिव्ह सोसायटी, नरेंद्र नगर, विकास सोसायटी, नरेंद्र नगर व विश्वजीत को-ऑपरेटिव्ह सोसायटी येथील सहा भूखंडांची, धरमपेठ झोन क्षेत्रातील महादेव नगर, जी. एन. एस. एम. गव्हर्नमेंट प्रेस एम्प्लॉईज सोसायटी, बंधू गृहनिर्माण व हिल व्ह्यू को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमधील सहा भूखंडांची विक्री करून थकबाकी वसूल करण्यात आली.
मालमत्ताधारकांनी संबंधित झोन कार्यालयांशी संपर्क साधून मालमत्ता कर ३१ डिसेंबर २०२१पूर्वी जमा करावा, तसेच थकबाकी तातडीने जमा करून कार्यवाही टाळावी, असे आवाहन मनपाचे उपायुक्त (महसूल) मिलिंद मेश्राम यांनी केले आहे.
....
अर्थसंकल्पात ३३२ कोटींचे उद्दिष्ट
अर्थसंकल्पात मालमत्ता कर वसुलीचे ३३२ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३१ डिसेंबर २०२१पूर्वी भरणा केल्यास मालमत्ता करातून शासनाचे कर वगळून शिल्लक रकमेवर पाच टक्के सूट दिली जाणार आहे.
.........
झोननिहाय बैठका
कर वसुलीसाठी झोननिहाय बैठका सुरू आहेत. झोन स्तरावर दर महिन्यासाठी कर वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ३३२ कोटींचे अर्थसंकल्पीय उद्दिष्ट गाठण्यासाठी दर महिन्यात नियोजन केले आहे.
...
सहा महिन्यात २४२ कोटी वसुलीचे उद्दिष्ट
सप्टेंबर - २६
ऑक्टोबर -२६
नोव्हेंबर - २६
डिसेंबर - ३२
जानेवारी- ३८
फेब्रुवारी -३४
मार्च - ६०
....
असे आहेत मोठे थकबाकीदार
५ लाखांहून अधिक ६५९
१ ते ५ लाख २,४०१
५० हजार ते १ लाख ५,२२४