नागपूर - कोरोनामुळे सर्वच रखडल्यासारखे, थांबल्यासारखे झाले आहे. मात्र, लाचखोरी थांबली नाही. लाचखोरांवर कोरोनाचा कसलाच परिणाम झालेला नाही. ते पूर्वी जसे होते तसेच आताही आहेत. लॉकडाऊनच्या काळात गेल्या दीड वर्षात लाचखोरीची थोडीथोडकी नव्हे, तब्बल ११६ प्रकरणे उघडकीस आली. त्यात २०२० ची ७२ आणि यावर्षी ऑगस्टपर्यंत ४४ लाचखोरीच्या प्रकरणांचा समावेश आहे.
विशेष म्हणजे, लाचखोरीसाठी पोलीस सर्वत्र बदनाम असले तरी गेल्या दीड वर्षात महसूल विभागाने त्यांना लाचखोरीत मागे सारले आहे. नागपूर विभागात झालेल्या एकूण ४४ कारवायांपैकी लाच मागितल्याची आणि स्वीकारल्याची ११ प्रकरणे महसूल विभागातील आहेत. दुसऱ्या क्रमांकावर पोलीस आहेत. या विभागातील आठ प्रकरणे आहेत.
----
कुटुंबीयांना नाहक मनस्ताप
लाचखोर मंडळी पैशाच्या लोभापोटी स्वत:ची नोकरी, प्रतिष्ठा डावावर लावतात. लाच घेताना पकडले गेल्यानंतर नोकरी तर जातेच. मात्र, सामाजिक बदनामीही खूप होते. या लाचखोरांमुळे त्याच्या कुटुंबीयांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
वर्ष - लाच प्रकरणे
२०१९. - १११
२०२० - ०७२
२०२१ (ऑगस्ट)- ४४
---
१० हजारांपासून दोन लाखांपर्यंत लाच
१० हजार हप्ता द्या, बिनधास्त दारू विका
१) बारच्या संचालकाला बिनदिक्कत दारू व्यवसाय करण्यासाठी १० हजारांची लाच मागणाऱ्या जयप्रकाश शर्मा नामक पोलीस कर्मचाऱ्याला २४ ऑगस्टला एसीबीने जेरबंद केले.
----
बिल काढायचे तर ७५ हजार द्या
२) बांधकामाचे बिल काढून देण्यासाठी कंत्राटदाराला ७५ हजारांची लाच मागणाऱ्या रमेशकुमार गुप्ताला ११ ऑगस्टला एसीबीने जेरबंद केले.
----
दोन लाख हवे अन्यथा...
३) लाखोंचे बिल मंजूर करायचे म्हणून जिल्हा परिषद नागपूरच्या पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय क्रिष्णूजी टाकळीकर (वय ५५) याने एका कंत्राटदाराला चक्क ६ लाख रुपयांची लाच मागितली होती. दोन लाख घेताना टाकळीकरांना एसीबीच्या पथकाने २६ जून २०२० ला रंगेहाथ पकडले होते.
-----
((कोट))
भ्रष्टाचाराची कीड संपवण्यासाठी एसीबी सज्ज आहेच. मात्र, समाजातील प्रत्येक घटकांचीही ती जबाबादारी आहे. कुणीही लाचेची मागणी केली, तर १०६४ या टोल फ्री क्रमांकावर किंवा एसीबीच्या कार्यालयात ०७१२-२५६१५२० क्रमांकावर संपर्क करावा.
रश्मी नांदेडकर
एसपी, एसीबी, नागपूर