लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यातील विद्यापीठांमध्ये प्राध्यापक भरतीची मागणी जोर धरत आहे. या भरतीसाठी शासन प्रयत्न करीत असून वित्त विभागानेदेखील मंजुरी दिली आहे. लवकरच प्राध्यापक भरतीला सुरुवात होईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर आले असताना मंगळवारी ते पत्रपरिषदेत बोलत होते.
प्राध्यापक भरतीसंदर्भात एक उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, समितीने मान्यता दिलेली सर्व पदे लवकरच भरली जाणार आहेत. राज्यात सहायक प्राध्यापकांची १५ हजारांहून पदे रिक्त आहेत. नेट-सेट पात्रताधारक तसेच पीएचडी झालेल्या उमेदवारांकडून भरतीसंदर्भात मागणी होत आहे. भरती करण्यासंदर्भात महाविकास आघाडी सरकार सकारात्मक आहे. उच्चस्तरीय समितीच्या सूचनेनुसार भरती लवकरच सुरू होईल, असे सामंत यांनी स्पष्ट केले.
बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकडे विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची परीक्षा जुलै महिन्याच्या अखेरीस किंवा ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात घेण्यात येईल, असेदेखील त्यांनी सांगितले.
यानंतर कुठल्याही परीक्षा रद्द होणार नाहीत
दरम्यान, कोरोनाच्या संसर्गामुळे दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी आता स्थिती नियंत्रणात असून यानंतर कोणत्याही परीक्षा रद्द होणार नसल्याचे सामंत यांनी गोंदियातील पत्रपरिषदेत सांगितले. ते म्हणाले, शिक्षण शुल्कासंदर्भात आलेल्या तक्रारीची शहानिशा केल्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. उच्च व तंत्रनिकेतनच्या कुठल्याही परीक्षा रद्द होणार नाहीत. राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन राज्यातील शैक्षणिक सत्रास केव्हापासून सुरुवात करायची यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार : कोरोना संसर्ग काळात उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांचा सत्कार करून मनोबल वाढविण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत. त्याचसाठी हा दौरा आहे. याची सुरुवात पूर्व विदर्भापासून सुरू केल्याचे सामंत यांनी सांगितले.