नागपूर/गडचिरोली/चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासांपासून सर्वदूर जोरदार पाऊस सुरू असून, जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे. अतिदुर्गम भामरागड तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. भामरागडमधील अंतर्गत आठ रस्त्यांसह मुख्य महामार्ग पाण्याखाली आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून, ४० पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, मंगळवारी चंद्रपुरात सर्वाधिक २६० मिमी पावसाची नाेंद झाली असून, संपूर्ण जलमय झालेल्या शहरातील शेकडाे घरे पाण्याखाली गेल्याची स्थिती हाेती.
१७ जुलै रोजी रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर धो-धो पावसाला सुरुवात झाली. आलापल्ली-भामरागड महामार्ग क्र. १३० ‘डी’वर भामरागड येथे पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. याशिवाय, जिल्हाभरातील १५ रस्ते पाण्याखाली गेले असून, वाहतूक बंद केली आहे. सायंकाळनंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. चामाेर्शी तालुक्यातील रेगडी येथील कन्नमवार धरण पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो झाले. चादरीवरून पाणी ओसंडून वाहत होते. यासोबतच इतर तालुक्यांतही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतशिवारात पाणीच पाणी झाले होते. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
दुसरीकडे, चंद्रपूर शहरालाही मंगळवारी जाेरदार पावसाचा तडाखा बसला. सकाळपासून धुवाधार पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले आहे. येथे १२ तासांत तब्बल २६० मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वाॅर्ड पाण्याखाली आले असून शेकडो घरांत पाणी शिरले. रस्त्यांवर तीन ते चार फूट पाणी साचल्याचे चित्र बघायला मिळाले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. जिल्ह्यातील बहुतांश नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे काही शेतांत पाणी साचले असून, मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, राजुरा तालुक्यातील गोवरी येथील नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने राजुरा-कवठाळा या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली. गडचांदूर-जिवती मार्गावर झाड कोसळल्याने हा मार्ग बंद होता. तर, चंद्रपूर-मूल मार्गावरील घंटाचौकी परिसरात एका वाहनावर झाड कोसळल्याने हा मार्ग काही वेळासाठी बंद होता. यामुळे दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पावसाची काेसळधार सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होती. दरम्यान, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, पाणीपातळी वाढल्यास जवळच्या महापालिका शाळांमध्ये आश्रय घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.
इतरत्र हलका-मध्यम पाऊस, दाेन दिवस ऑरेंज अलर्ट
नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांत हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस हाेता. वर्ध्यात दिवसा ३१ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. नागपूरला १२ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात सायंकाळपासून पावसाचा जाेर वाढला हाेता. दरम्यान, काही दिवसांच्या पावसाने पूर्व विदर्भातील बॅकलाॅग भरून काढला आहे. भंडारा, गाेंदिया व आता गडचिराेली, चंद्रपुरात पाऊस सरप्लस झाला असून, नागपूर व वर्ध्यात असलेली तूट सामान्य आहे. अकाेला, अमरावतीत मात्र तूट २५ टक्क्यांवर आहे. विदर्भात पुढचे दाेन दिवस पुन्हा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, काही ठिकाणी अतितीव्र पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
वीज कोसळून एक ठार
धानोरा तालुक्यातील खांदाळी शेतशिवारात संजय देवशा उसेंडी (वय २८, रा. पवनी, धानोरा) हा झोपडीकडे गुरे घेऊन जात होता. वाटेत वीज अंगावर कोसळली. यात तो जागीच गतप्राण झाला. तर उत्तम हिरामण पदा (वय २५, रा. सालेभट्टी, ता. धानोरा) हा जखमी झाला. जखमीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
भंडारा जिल्ह्यातही संततधार
भंडारा जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर तिसऱ्या दिवशीही कायम होता. जिल्ह्यातील सातही तालुके मिळून एकूण सरासरी ७१ मिमी पाऊस बरसला. वैनगंगा नदीला पूर आलेला नसून नदीची पातळी कायम ठेवण्याच्या उद्देशाने गोसेखुर्द धरणातून सातत्याने टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. सद्यस्थितीत गोसेखुर्द धरणाचे नऊ दरवाजे उघडले आहेत. भंडारा शहराला लागून वाहत असलेल्या कारधा-वैनगंगा नदीची पातळी इशारा व धोक्याच्या पातळीपेक्षा कमी वाहत आहे. लाखनी तालुक्यातील कवलेवाडा येथे झाडावर वीज कोसळल्याने जवळ बांधलेल्या दोन गायींपैकी एकीचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला.
पश्चिम विदर्भात पावसाची रिपरिप
पश्चिम विदर्भात आठ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. २४ तासांत सरासरी २.७ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये अकोला जिल्ह्यात दिवसभर वाताव ढगाळ पण उघाड अशी स्थिती होती. पेरणीला व पिकांच्या वाढीसाठी पाऊस पोषक ठरला आहे. यवतमाळ जिल्ह्यातही रिमझिम पावसाने हजेरी लावली. हा पाऊस सरासरी ३.५ मिमी इतका राहिला. सर्वाधिक १३ मिमी पाऊस उमरखेड तालुक्यात नोंदविण्यात आला. हवामान विभागाने २४ जुलैपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विभागात अद्याप २५ टक्के पावसाची तूट आहे. या आठवड्यात ही तूट भरून निघण्याची शक्यता आहे. विभागात १ जूनपासून २८६६ मिमी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २१३.६ मिमी. पावसाची नोंद झाली. ती ७४.५ टक्के आहे.
संजय सरोवर धरणाचे दरवाजे उघडले
गोंदिया जिल्ह्यात महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर सोमवारी व मंगळवारी पावसाची रिपरिप कायम होती. गेल्या २४ तासांत २२.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणाचे ५ दरवाजे रात्री उघडण्यात आले. त्यामुळे नदीकाठालगतच्या गावकऱ्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला.