राम वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : यावर्षी कपाशीवर बोंडअळींसोबतच ‘रेड बग’ (लाल ढेकूण)चा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. हा कापूस शेतातून घरी आणल्यानंतर शेतकऱ्यांनी भाववाढीच्या प्रतीक्षेत अजूनही घरीच साठवून ठेवला आहे. काहींनी तो आता विकायला सुरुवात केली आहे. मात्र, या ‘रेड बग’मुळे शेतकऱ्यांसह कापूस हाताळणीचे काम करणाऱ्या मजुरांना त्वचेचे आजार जडायला सुरुवात झाली असून, याला डॉक्टरांनीही दुजोरा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर नवीन समस्या निर्माण झाली आहे.भिवापूर तालुक्यातील नांद, भगवानपूर, चिखलापार, बेसूर, धामणगाव, लोणारा यासह परिसरातील गावांमधील शेतकरी व मजुरांना या ‘रेड बग’मुळे त्वचेचे आजार जडल्याचे दिसून येते. त्यांच्या शरीराला मोठ्या प्रमाणात खाज येत असून, शरिरावर ठिकठिकाणी लाल रंगाचे चट्टे तयार झाले आहेत. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य या आजाराने त्रस्त झाला आहे. याची प्रचिती नांद प्राथमिक आरोग्य केंद्रातील वाढलेल्या रुग्णांच्या संख्येवरून येत असून, त्यात बहुतांश रुग्ण त्वचेच्या आजाराचे आहेत, अशी माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.शेवटच्या वेचणीच्या कापसावर या ‘रेड बग’चा प्रादुर्भाव अधिक असल्याचे दिसून आले. हे ‘रेड बग’ कापसासोबत शेतातून शेतकऱ्यांच्या घरी आले.
कृषी विभाग अनभिज्ञया आजाराबाबत कृषी विभागाला अद्याप कोणतीही माहिती नाही. परिसरातील मजुरांना कामाअभावी कापूस हाताळणीची कामे करावी लागत असून, शेतकऱ्यांना हा कापूस मिळेल त्या भावात विकावा लागत आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांसह मजुरांनी या आजाराकडे दुर्लक्ष केले. नंतर काहींनी उपचाराला सुरुवात केली. काहींनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्यायला सुरुवात केली तर काहींनी गावठी इलाजावर भर दिला आहे. काही रुग्ण ‘काऊंटर मेडिसीन’ घेऊन काळ काढत आहेत.
लाळ व विष्ठा घातककापूस हे ‘रेड बग’चे खाद्य आहे. त्यांचे जीवनचक्र कापसावरच पूर्ण होते. ते त्यांची लाळ व विष्ठा कापसावरच सोडतात. या ‘रेड बग’ची संख्या अधिक असल्याने लाळ व विष्ठा सोडण्याचे प्रमाणही तुलनेत अधिक आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही बाबी साध्या डोळ्याने सहज. दिसून येत नाही. त्यांची लाळ व विष्ठा घातक असून, या लाळ व विष्ठा पसरलेल्या कापसाच्या संपर्कात जो येईल, त्याच्या शरीराला खाज सुटते. त्यानंतर या खाजेचे रूपांतर लाल रंगाच्या चट्ट्यांमध्ये होते.
योग्य उपचार घ्यावेतखाज व शरीरावर लाल चट्टे असलेल्या रुग्णांची संख्या परिसरात वाढत आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्याची संख्या तुलनेत कमी आहे. हा आजार कापूस हाताळणाऱ्या मजुरांमध्ये अधिक दिसून येतो. त्वचेचा हा आजार प्राथमिक उपचाराने बरा होतो. त्यामुळे शेतकरी व मजुरांनी मनात भीती बाळगण्याचे कारण नाही. त्यांनी योग्य उपचारावर भर द्यावा.- डॉ. मदन राजपूत, वैद्यकीय अधिकारी,प्राथमिक आरोग्य केंद्र, नांद.