नागपूर : सावळ्या विठूरायाच्या दर्शनाच्या ओढीने कासाविस झालेल्या भाविकांना पंढरीची वारी घडविण्यासाठी 'लालपरी'ची धावपळ वाढली आहे. या पार्श्वभूमीवर, आज गुरुवारी नागपूर, सावनेर तालुक्यातील तर बुधवारी जलालखेडा, काटोल तसेच नागपूरसह अन्य ठिकाणच्या भाविकांना घेऊन एसटीची लालपरी पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे.
राज्याच्या गावागावांत सध्या पेरणी, डोबणी, लावणीसाठी लगबग सुरू आहे. दुसरीकडे आषाढी यात्रा पुढ्यात असल्याने लाखो वारकरी विठूरायाच्या दर्शनभेटीसाठी आसुसलेले आहेत. कधी एकदा जातो आणि लाडक्या विठ्ठलाची भेट घेतो, अशी अनेकांची अवस्था आहे. त्यामुळे कुणी आपल्या खासगी वाहनांनी, कुणी भाड्याचे वाहन करून तर कुणी रेल्वेगाडीने पंढरी गाठू लागले आहेत.
गाठीशी मोजकाच पैसा असल्यामुळे आणि तिकिट भाड्यात ५० टक्के सुट असल्यामुळे अनेकांना पंढरपूर गाठण्यासाठी एसटीच सोयीची झाली आहे. त्यामुळे अनेक जण पंढरीच्या वारीसाठी एसटीकडे धाव घेत असल्याने ठिकठिकाणची बसस्थानक भाविकांच्या गर्दीने चांगलीच फुलली आहेत. त्यात प्रवाशांनी मागणी केल्यास त्यांच्याच गावातून थेट पंढरपूरसाठी बस नेण्याची योजना यावर्षी एसटी महामंडळाने जाहिर केली. त्यामुळे अनेक गावचे भाविक एसटीला आपल्या गावात बोलवून पंढरीचा मार्ग धरत आहेत.
२५० बसेसचे नियोजनपंढरपूर यात्रेसाठी नागपूर जिल्ह्यातून २५० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. साधारणत: १२५ बसेस अमरावती विभागात पाठविण्यात येणार असून भाविकांची संख्या वाढली तर आणखी काही बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे एसटीचे नागपूर विभागाचे महाव्यवस्थापक श्रीकांत गभणे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे. बुधवार आणि गुरुवार अशा दोन दिवसांत नागपूर जिल्ह्यातून एकूण पाच बसेस पंढरपूरकडे रवाना झाल्या, अशीही माहिती त्यांनी दिली आहे.
वारकऱ्यांच्या हस्ते पूजा, शूभेच्छाबुधवारी काटोल आगाराच्या जलालखेडा या गावातून ५४ प्रवाशांनी एसटीला गावात बोलवून घेतले आणि पंढरीचा मार्ग धरला. दुसरीकडे नागपूरसह अन्य काही गावातील एकूण ४० प्रवाशांनी गणेशपेठ बसस्थानकावरून (तिरंगा चाैक) पंढरपूरकडे प्रयाण केले.
आज गुरुवारी दोन बसेस सावनेर बसस्थानकावरून पंढरपूरकडे रवाना झाल्या. एका बसमध्ये ४२ तर, दुसऱ्या बसमध्ये ३८ प्रवासी होते. तिकडे नागपूरच्या गणेशपेठ स्थानकावरूनही ३६ प्रवाशांना घेऊन एक बस दुपारीच पंढरीकडे निघाली. गणेशपेठ बसस्थानकावर वारकऱ्यांच्या हस्ते बसची पूजा करून गणेशपेठ आगार व्यवस्थापक अनिल आमनेरकर, वाहतूक निरीक्षक अढावू, तांबेकर आणि सहकाऱ्यांनी वारकऱ्यांना तसेच बसच्या चालक-वाहकांना पंढरीच्या वारीसाठी शुभेच्छा दिल्या.