लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शहरातील बदनाम वस्ती असलेल्या गंगाजमुनातील देहव्यापाराचे अड्डे बंद करण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिसांनी बुधवारी गंगाजमुना वस्तीच्या गल्ली सील करून त्याची सुरुवात केली. देहव्यापारासाठी चर्चेत असलेल्या गंगाजमुनातील सामाजिक कार्यकर्ता आणि परिसरातील नागरिकांनी ही वस्ती हटविण्यासाठी आंदोलन केले होते. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना सहा महिन्यापासून नागरिकांनी हे अड्डे बंद करण्याची मागणी केली होती. या मागणीकडे गंभीरतेने लक्ष देऊन पोलीस आयुक्तांनी देहव्यापाराचे अड्डे बंद करण्याचे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, लकडगंज पोलिसांनी बॅरिकेड्स लावून देहव्यापाराच्या अड्ड्यांकडे जाणारे मार्ग बंद करून कलम १४४ लागू करून कारवाई सुरू केली आहे. गंगाजमुना वस्तीत शेकडो देहव्यापाराचे अड्डे आहेत. अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७ नुसार धार्मिक किंवा शैक्षणिक स्थळाच्या २०० मीटरच्या परिसरात देहव्यापारास बंदी आहे. त्यानुसार पोलीस आयुक्त लवकरच अधिसूचना काढणार आहेत. कलम १८ नुसार देहव्यापाराचे अड्डे बंद करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. देहव्यापाराचे बहुतांश अड्डे अवैध आहेत.
या बांधकामाला महापालिकेच्या माध्यमातून पाडण्यात येणार आहे. याबाबत महापालिका प्रशासनाशी चर्चा करण्यात आली आहे. अनेक देहव्यापाराच्या अड्ड्यांचे संचालक बाहेरचे आहेत. त्यांनी भाडे वसूल करण्यासाठी गुन्हेगार ठेवले आहेत. या गुन्हेगारांसोबत मुलींचे दलालही सक्रिय आहेत.
अड्ड्यांचे मालक, त्यांना मदत करणारे गुन्हेगार आणि मुलींचे दलाल यांच्या बंदोबस्तासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. देहव्यापारातील बहुतांश मुली आणि महिला इतर राज्यातील आहेत. कारवाईदरम्यान त्यांना त्यांच्या राज्यात पाठविण्यात येणार आहे. तसेच अल्पवयीन मुलींची सुटका करून त्यांना बाल सुधार गृहात पाठविण्यात येईल.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, देहव्यापाराच्या अड्ड्यावर महिलांचे शोषण होते. अल्पवयीन मुलींकडून देहव्यापार करवून घेणे गुन्हा आहे. गंगाजमुनाच्या अड्ड्याचा समाज आणि परिसरावर वाईट परिणाम होत असल्याचे ते म्हणाले.
..................