लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बोगस क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर सेवानिवृत्तीनंतरही महाराष्ट्र शासन लिहिलेल्या कारमध्ये फिरत होता. पोलिसांना त्याच्या घराची झडती घेताना दस्तावेजांसह शासनाच्या वाहनावर लावण्यात येणारे दोन लाल दिवेही सापडले. दरम्यान मानकापूर पोलिसांनी रेवतकर आणि क्रीडा अधिकारी महेश पडोळे यांना आज न्यायालयासमोर सादर करून २० ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी घेतली आहे.
मानकापूर पोलिसांनी क्रीडा प्रमाणपत्र घोटाळ्यात मंगळवारी रेवतकर व पडोळे याना अटक केली होती. यापूर्वी रत्नागिरीचे क्रीडा अधिकारी सुभाष सावंत याना अटक करण्यात आली. या घोटाळ्यात क्रीडा विभागातील अनेक वरिष्ठ अधिकारी गुंतले आहेत. त्यांनी लोकांना बोगस क्रीडा प्रमाणपत्र दिले आहेत. आतापर्यंतच्या तपासात २६ लोकांना अशा प्रकारचे बोगस प्रमाणपत्र देण्यात आल्याचे उघडकीस आले आहे. अनेकांनी शासकीय नोकरीही मिळविली आहे. सावंतच्या भावाची एमपीएससीमधून पीएसआयसाठी निवडही झाली होती. प्रमाणपत्राची बाब उघडकीस आल्यावर त्याला हटविण्यात आले. तो सध्या तुरुंगात आहे.
सुभाष रेवतकर मानकापूर येथील बंधू नगरात राहतात. मानकापूर पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली. या दरम्यान दस्तावेजांसह महाराष्ट्र
शासन असे लिहिलेली क्रेटा कार आणि दोन लाल दिवे सापडले. रेवतकर मे महिन्यात सेवानिवृत्त झाले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावरही ते शासकीय अधिकाऱ्यासारखे राहत असल्याचे पाहून पोलीसही आश्चर्यात पडले. पोलिसांनी विचारपूस केली असता ते समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही. यानंतर कार व लाल दिवे आणि इतर दस्तावेज जप्त करण्यात आले.