लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गंगा-जमुना वस्तीतील देह व्यवसायाचा अड्डा बंद करण्याच्या तयारीत असलेल्या पोलिसांनी या परिसरातील पोलीस चौकी आणि महावितरणचे केंद्र याला सार्वजनिक स्थळ घोषित केले आहे. यानुसार याच्या २०० मीटर परिसरात देह व्यापार करणे आणि त्यासाठी प्रवृत्त करणाऱ्यांविरुद्ध पीटा अंतर्गत कारवाई केली जाईल. (Redlight area Ganga-Jamuna declared a public place in Nagpur)
गंगा-जमुना वॉर्ड ३६ व ३७ मध्ये येतो. येथील धार्मिक व शैक्षणिक ठिकाण सार्वजनिक स्थळ आहेत. या परिसरातील देहविक्री व्यवसायाचा अड्डे पोलीस चौकी आणि महावितरणच्या केंद्राजवळ आहेत. पोलीस आयुक्तांना अनैतिक व्यापार अधिनियम (पीटा)च्या कलम ७ अन्वये कोणत्याही जागेला सार्वजनिक स्थळ घोषित करण्याचा अधिकार आहे. याअंतर्गत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंगा-जमुनातील पोलीस चौकी आणि महावितरण केंद्राला सार्वजनिक स्थळ घोषित करण्याची अधिसूचना जारी केली आहे. ही अधिसूचना ६० दिवसांसाठी जारी करण्यात आली आहे.
यावर काही आक्षेप असल्यास ३० दिवसांच्या आत पोलीस आयुक्त कार्यालयात आपले आक्षेप नोंदवता येतील. त्यावर सुनावणी होऊन योग्य निर्णय घेतला जाईल. पोलिसांनी नागरिकांना देह व्यापार रोखण्यास मदत करावी, असे आवाहन केले आहे.