हायकोर्टात याचिका : नाग नदीतील सांडपाणी कारणीभूतनागपूर : वैनगंगा नदीला प्रदूषणमुक्त करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. पिंकी उके असे याचिकाकर्तीचे नाव असून त्या भंडारा येथील संकल्प मायनॉरिटी सोसायटीच्या सचिव आहेत. वैनगंगा नदीचे प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे. नदीच्या प्रवाहाजवळच्या उद्योगांतील रासायनिक पाणी आणि नाग नदी व पिली नदीतील सांडपाणी वैनगंगेच्या प्रदूषणास कारणीभूत आहे. गोसेखुर्द धरणामुळे वैनगंगेचे पाणी एकाच ठिकाणी साचले आहे. परिणामी प्रदूषणाची पातळी कमी होत नाही. विदर्भातील शेतकरी विविध कारणांमुळे आत्महत्या करतात. त्यामागे पाणी टंचाई हे एक कारण आहे. वैनगंगा नदी पाण्याचा मोठा स्रोत आहे. ही नदी कामठी, भंडारा, तुमसर व पवनी येथून वाहते. परंतु, योग्य पद्धतीने नियोजन होत नसल्यामुळे पाणी टंचाई भासते असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे. नदीचे पाणी शुद्ध करून ते नागरिकांना पुरविण्याची व्यवस्था करण्यात यावी, रासायनिक पाणी व सांडपाणी वैनगंगा नदीत मिसळणार नाही याची काळजी घेण्यात यावी, प्रदूषण थांबविण्यासाठी काय उपाययोजना करण्यात येत आहे हे संबंधित विभागाने जाहीर करावे इत्यादी विनंत्या याचिकेत करण्यात आल्या आहेत.(प्रतिनिधी)
वैनगंगा नदीला प्रदूषणमुक्त करा
By admin | Published: June 25, 2016 2:53 AM