नागपूर : पाच एकर ओलित शेतजमिनीची मालकीण असलेल्या आणि दंतचिकित्सक मुलाकडे राहत असलेल्या पत्नीच्या अंतरिम खावटीमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कपात केली. तिला ४० ऐवजी २५ हजार रुपये सुधारित मासिक खावटी मंजूर करण्यात आली. न्यायमूर्ती विनय जोशी यांनी हा निर्णय दिला.
पती परभणी येथील महाविद्यालयात व्याख्याता आहे. पत्नी सध्या अकोला येथे राहत आहे. १६ जानेवारी २०२१ रोजी कुटुंब न्यायालयाने पत्नीला मासिक ४० हजार रुपये अंतरिम खावटी मंजूर केली होती. त्याविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
पत्नीला शेतजमिनीतून आर्थिक उत्पन्न मिळते, तसेच ती दंतचिकित्सक मुलासोबत राहत आहे. त्यामुळे ती स्वत:ची देखभाल करू शकते. याशिवाय, ती स्वत:हून विभक्त झाली आहे. परिणामी, तिला खावटी दिली जाऊ शकत नाही, असा दावा पतीने केला होता. पत्नीला आतापर्यंत सुमारे २० लाख रुपये खावटी दिली, असेही त्याने न्यायालयाला सांगितले. न्यायालयाने हे मुद्दे व पतीचे १ लाख ३७ हजार रुपये मासिक वेतन लक्षात घेता पत्नीला पतीच्या दर्जासमान जीवन जगण्यासाठी २५ हजार रुपये मासिक खावटी पुरेशी आहे, असे स्पष्ट केले.