नागपूर : काेकणातून विराेध हाेत असताना महत्त्वाकांक्षी नाणार प्रकल्प विदर्भात आणण्याची मागणी काही नेत्यांकडून केली जात आहे. या प्रकल्पामुळे हजाराे तरुणांना राेजगार मिळेल, असे बाेलले जात आहे. विदर्भातील किती तरुणांना राेजगार मिळेल याची शाश्वती नाही; पण, हा प्रकल्प उभारल्यास प्रदेशातील शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी आणि लाेकांचे आराेग्य निश्चित धाेक्यात येइल, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
रिफायनरीज विदर्भात व्यवहार्य का नाही?
रिफायनरीजमध्ये मोठ्या प्रमाणात वाफ व थंड पाण्याचा वापर आवश्यक असते. साधारणपणे एक बॅरेल (१५९ लीटर) कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्यासाठी दीड बॅरल पाणी लागते. त्यामुळे त्यांना पाण्याचा मुबलक स्रोत असणे आवश्यक आहे. म्हणूनच बहुतेक ऑइल रिफायनरीज समुद्रकिनारी, जेथे नदी समुद्रात मिळते तेथे आहेत. ८० टक्क्यांहून जास्त कच्चे तेल समुद्रामार्गे भारतात येते. समुद्र किनारपट्टीवरून ७०० किमी अंतर पार करून विदर्भात आणणे आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नाही.
प्रदूषणाची माेठी समस्या
ऑइल रिफायनरीमध्ये कच्चा तेलाचे रूपांतर पेट्रोल, डिझेलमध्ये करताना विविध रासायनिक प्रक्रियांचा समावेश असतो. ज्यामधून माेठ्या प्रमाणात प्रदूषके बाहेर पडतात. हानिकारक कचऱ्यामुळे जमीन प्रदूषित होते. रासायनिक पदार्थांच्या उत्सर्जनामुळे जलप्रदूषण होते. रिफायनरीच्या १० किलोमीटरपर्यंत राहणे तसे आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. उत्सर्जित होणारे बरेच वायू मानवासाठी हानिकारक असतात. दमा, खोकला, छातीत दुखणे, त्वचेची जळजळ, मळमळ, डोळ्यांच्या समस्या, डोकेदुखी, जन्मदोष, रक्ताचा कर्करोग अशा प्रकारच्या अनेक आजारांसाठी हे प्रदूषण कारणीभूत ठरणारे आहे. अभ्यासानुसार रिफायनरीशेजारी असलेल्या शाळेतील मुलांना ३० ते ४० टक्के श्वसनाचा जास्त त्रास सहन करावा लागतो.
वीज प्रकल्पाचा अनुभव लक्षात घ्या
- महाराष्ट्रात निर्माण होणाऱ्या विजेमध्ये ५९ टक्के वाटा विदर्भाचा आहे. त्यासाठी लागणारे मुबलक पाणी येथील जनतेला, शेतकऱ्यांना न मिळता ते वीजनिर्मितीसाठी वापरले जाते. वीजनिर्मितीत होणाऱ्या प्रदूषणाचे दुष्परिणामही विदर्भवासीयांना भोगावे लागतात. शिवाय हक्काची वीजही मिळत नाही. आधीच विदर्भाचा सिंचनाचा अनुशेष १ लाख ६० हजार हेक्टरपेक्षा अधिकचा आहे. त्यात रिफायनरी प्रकल्प फायदेशीर ठरणार नाही.
............
रिफायनरीमुळे मोठ्या प्रमाणात प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या रोजगारनिर्मिती अपेक्षित आहे. पण, निर्माण होणारा रोजगार फक्त विदर्भातील युवकांनाच मिळेल याची काय शाश्वती, त्यासाठी येथील शेतकऱ्यांच्या जमिनी, सिंचनाचे पाणी वापरून आणि प्रदूषणाने आरोग्य धोक्यात घालणे कितपत योग्य ठरेल, विदर्भाच्या विकासासाठी, आर्थिक प्रगती व रोजगार उपलब्धतेसाठी रिफायनरीसारखे प्रकल्प येथे होण्याची व्यवहार्यता तपासणे आवश्यक आहे.
- डाॅ. संजय खडक्कार, माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ.