सावरगाव : स्थानिक नागरिकांची गरज लक्षात घेता गतवर्षी सावरगाव (ता. नरखेड) येथे प्रवासी निवारा बांधण्यात आला होता. मात्र हा प्रवासी निवारा आता दारुड्यांचा अड्डा बनला आहे. या प्रवासी निवाऱ्यापासून सावरगाव पोलीस चौकी हाकेच्या अंतरावर आहे. मात्र पोलिसांना हे अद्यापही दिसले नाही, यावरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जवळपास दीड महिन्यापासून कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन आहे. त्यामुळे राज्यातील प्रवासी वाहतूक करणारी एसटी सेवा बंद आहे. त्यामुळे प्रवासी निवारे प्रवाशाविना सुनसान पडले आहेत. मात्र या प्रवासी निवाऱ्याचा दारुडे दारू पिण्यासाठी उपयोग करून घेत आहेत. सायंकाळी दारुड्यांची येथे होणारी गर्दी कोरोना संक्रमणाला निमंत्रणही देत आहे. येथे दारू पिणे झाल्यावर दारुडे दारूच्या बाटल्या येथेच टाकून जातात. त्यामुळे प्रवासी निवाऱ्यात आता रिकाम्या बाटल्यांचा खच पडला आहे. एखाद्या सुज्ञ नागरिकाने त्यांना हटकले तर त्याला दारुडे शिवीगाळ करतात. त्यामुळे किमान पोलिसांनी तरी या तळीरामांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी सावरगाव येथील नागरिकांकडून केली जात आहे.