नागपूर : स्वत:चे घर बांधण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांना फसवून तब्बल पाच कोटी रुपये हडपणाऱ्या चार आरोपींना अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आराेपींचे अटकपूर्व जामिनाचे अर्ज फेटाळून लावले आहेत. न्यायमूर्ती विनय जोशी यांनी आरोपींना हा दणका दिला.
आरोपींमध्ये राजश्री अमरदीप कांबळे, अनिषा अमरदीप कांबळे, वासुदेव हरिश्चंद्र इंगोले व कमलेश दिनकर समर्थ यांचा समावेश आहे. पीडित ग्राहक वर्षा भुरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी या आरोपींविरुद्ध भादंविच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२०-ब अंतर्गत एफआयआर नोंदविला आहे. यातील आरोपी इंगोले सिटी सर्व्हे कार्यालयात कार्यरत होता. मौजा गोरेवाडा (खसरा क्र. १०३/४/सी) येथील संबंधित जमिनीचे पहिले मालक नीलकंठ मेंढे हाेते. त्यांनी ही जमीन जमीन १९८४ मध्ये नीलिमा शुक्ला यांना विकली होती. असे असताना, आरोपी राजश्रीने मेंढे यांच्या वारसदारांना हाताशी पकडून ही जमीन मुलगी अनिषाच्या नावाने खरेदी केली. या व्यवहारात २३ मे २०१८ रोजी विक्रीपत्र नोंदविण्यात आले. या जमिनीच्या रेकॉर्डवर अवैधरीत्या अनिषाचे नाव चढविण्यात आले. त्यानंतर बनावट एनए ऑर्डर काढण्यासाठी इंगोलेला ९ लाख ३० हजार रुपये देण्यात आले. पुढे आरोपींनी या जमिनीला लागून असलेल्या वन विभागाच्या जमिनीवर ले-आउट टाकले व ती जमीन स्वत:च्या मालकीची असल्याचे भासवून तेथील ३३ भूखंड सुमारे ५ कोटी रुपयांत ग्राहकांना विकले, असा आरोप आहे. फिर्यादीच्या वतीने ॲड. श्रीरंग भांडारकर व ॲड. पी. मासूरकर यांनी कामकाज पाहिले.