लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्यासाठी मेडिकलमध्ये ४०० खाटा वाढविण्याचा निर्णय सप्टेंबरमध्ये घेण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ११ कोटी ७२ लाखांचा निधी उपलब्धही करून दिला जाणार होता, परंतु सहा महिन्यांचा कालावधी होऊनही या खाटा तयार नाहीत. सध्याच्या स्थितीत केवळ ५१० खाटा असून, ४७० खाटांवर रुग्ण आहेत. यातील काही खाटा कोरोनाचा प्रसूती वॉर्ड, बालरोग विभागातील असल्याने रविवारी कोरोनाचा काही रुग्णांना भरती करण्यास चक्क नकार देण्यात आल्याची माहिती आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी २५ सप्टेंबर रोजी मेडिकलला भेट दिली असता, कोरोना रुग्णांसाठी केवळ ६०० खाटा उपलब्ध असण्यावर नाराजी व्यक्त केली. खाटा वाढविण्याचे निर्देशही दिले होते. त्यानुसार, तत्कालीन अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा यांनी डॉ.सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यांची समिती स्थापन केली. समितीने आठवडाभरात अहवाल सादर केला. यात मेडिकलच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावरील १० वॉर्डात प्रत्येकी ४० नुसार ४०० खाटांच्या सोयीसोबतच २०० डॉक्टर, २०० परिचारिका व १०० कर्मचाऱ्यांसह आवश्यक यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्याचे प्रस्ताव सादर केला. याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली. ११ कोटी ७२ लाखांचा निधीची तरतूदही करण्यात आली. वॉर्ड क्र. ७, ८, ९, १०,११, १४, १७,१८, १९ व २० हे वॉर्ड रिकामे करून ऑक्सिजन पाइपलाइन टाकण्याच्या कार्याला सुरुवात झाली.
सूत्रानुसार, नोव्हेंबर महिन्यापासून रुग्णसंख्या कमी होऊ लागल्याने, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मिळणारा निधीला ब्रेक लागला. यामुळे कामे खोळंबली. आता रुग्णसंख्या वाढत असताना निधी घ्या आणि कामे तातडीने पूर्ण करा, असे निर्देश दिले जात आहे, परंतु ४०० खाटांचे हे वॉर्ड सुरू होण्यास आणखी १५ दिवसांवर कालावधी लागण्याची शक्यता आहे. दुसरीकडे सध्या उपलब्ध असलेल्या ५१० खाटांवर ४७० रुग्ण भरती आहेत. ज्या खाटा रिकाम्या आहेत, त्या कोरोना प्रसूती वॉर्ड, बालरोग वॉर्डातील आहेत. यामुळे इतर रुग्णांना खाटा नसल्याचे सांगून परत पाठविले जात आहे.
-सीएमओने खाट नसल्याचे केले कारण पुढे
मेडिसिनच्या कॅज्युअल्टीमध्ये कर्तव्यावर असलेल्या ‘सीएमओ’ने रविवारी काही रुग्णांना खाट नसल्याचे कारण पुढे करीत परत पाठविल्याची माहिती, मेडिकलच्याच एका कर्मचाऱ्याने दिली. कौशल्या खंडाळ नावाची कोविड महिला सायंकाळी ६.३० वाजता कॅज्युअल्टीत आली, त्यावेळीही तिला खाट नसल्याचे कारण सांगितले, परंतु नातेवाइकांनी वरिष्ठ डॉक्टरांना याची माहिती दिल्यावर, तब्बल तासाभरानंतर कशीतरी एक खाट मिळाली.
- आता लसीकरण केंद्र डीनच्या बंगल्यात
सध्या वॉर्ड क्र.४९ मध्ये कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र आहे, परंतु वाढत्या रुग्णसंख्येला लक्षात घेऊन येथील लसीकरण केंद्र रिकाम्या असलेल्या डीनच्या बंगल्यात स्थानांतरित केले जाणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. सोबतच ट्रॉमा केअर सेंटरमधील तळमजल्यावरील ९० खाटांचा वॉर्डावर आक्षेप घेण्यात आल्याने तो बंद करण्यात आला होता. आता त्यात दुरुस्ती करून, तोही वॉर्ड सुरू करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.