नागपूर : केंद्रीय प्रशासकीय न्यायाधिकरणच्या नागपूर खंडपीठाने अंतरिम आदेश जारी करून आयकर विभागामध्ये कार्यरत आरक्षित प्रवर्गातील कर्मचाऱ्यांना खुल्या प्रवर्गातील पदांवर बढती देण्यास मनाई केली आहे. या प्रकरणावर आता येत्या २६ ऑक्टोबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.
स्वयं गुणवत्ता योजनेंतर्गत घेण्यात आलेली विभागीय परीक्षा उत्तीर्ण करून खुल्या प्रवर्गामधील पदांवर बढती मिळण्यासाठी पात्र झालेल्या आरक्षित प्रवर्गातील कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करण्यासाठी आयकर विभागाने समिती स्थापन केली आहे. त्या संदर्भात १२ जून २०२३ रोजी आदेश जारी करण्यात आला आहे. त्याविरुद्ध खुल्या प्रवर्गातील ५२ आयकर कर्मचाऱ्यांनी न्यायाधिकरणात अर्ज दाखल केला आहे.
त्यावरील सुनावणीदरम्यान, अर्जदारांचे वकील ॲड. तुषार मंडलेकर यांनी वादग्रस्त आदेश अवैध असल्याचा दावा केला. केंद्र सरकारने ११ जुलै २००२ रोजी आदेश जारी करून स्वयं गुणवत्ता योजना जाहीर केली होती. तो आदेश या न्यायाधिकरणच्या मद्रास खंडपीठाने रद्द केला होता.