नागपूर : नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीची नवीन निवडणूक होतपर्यंत जुनी कार्यकारी समिती कार्यरत ठेवण्यात यावी, ही मागणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी अमान्य केली व यासंदर्भातील याचिका निकाली काढली. न्यायमूर्तीद्वय अतुल चांदूरकर व पुष्पा गणेडीवाला यांनी हा निर्णय दिला.
ही याचिका संचालक अहमदभाई करीमभाई शेख यांनी दाखल केली होती. बाजार समितीच्या संचालक मंडळाचा कार्यकाळ ९ मार्च २०१७ रोजी संपला आहे. २२ मार्च २०१७ रोजी जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीचे व्यवस्थापन सांभाळण्यासाठी प्रशासकाची नियुक्ती केली आहे. दरम्यान, १६ जानेवारी २०१८ रोजी उच्च न्यायालयाने प्रशासकाची नियुक्ती योग्य ठरवून जिल्हाधिकाऱ्यांना बाजार समितीच्या निवडणुकीसाठी मतदार यादी तयार करण्याचे निर्देश दिले होते. परंतु, विविध कारणांमुळे अद्याप निवडणूक झाली नाही. परंतु, काही दिवसांपूर्वी जिल्हा उपनिबंधकांनी बाजार समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. उच्च न्यायालयाने ही बाब लक्षात घेता जुनी कार्यकारी समिती कार्यरत ठेवण्यास नकार दिला, तसेच जाहीर कार्यक्रमानुसार निवडणूक न झाल्यास अहमदभाई शेख यांना पुन्हा ही मागणी करण्याची मुभा दिली. सरकारच्या वतीने ॲड. संगीता जाचक यांनी कामकाज पाहिले.