लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : वनातील कोअर क्षेत्रात शिरून वाघाची शिकार करणाऱ्या गुन्हेगारावर कोणत्याही प्रकारची दया दाखवली जाऊ शकत नाही. अशा गुन्हेगारांना धडा शिकवला जातो. त्यांना कठोर शिक्षा केली जाते हा संदेश समाजामध्ये जाणे आवश्यक आहे, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व पुष्पा गणेडीवाला यांनी मध्य प्रदेशातील कुख्यात शिकारी कुट्टू ऊर्फ राहुल पारधी याची एक याचिका फेटाळताना स्पष्ट केले.
पारधीला वन्यजीव व वन कायद्यांतर्गतच्या तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये शिक्षा झाली आहे. त्याला १८ एप्रिल २०१७ रोजी पवनी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावास व १५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास, ५ मे २०१७ रोजी देसाईगंज प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ३ वर्षे सश्रम कारावास व ५०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १५ दिवस अतिरिक्त कारावास, तर १० ऑक्टोबर २०१७ रोजी तुमसर प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने ३ वर्षे कारावास व २५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावली आहे. या तिन्ही शिक्षा एकत्र भोगण्याचा आदेश मिळविण्यासाठी त्याने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. उच्च न्यायालयाने पारधीचे गंभीर गुन्हे लक्षात घेता त्याला दिलासा देण्यास नकार दिला. त्यामुळे पारधीला पूर्ण ९ वर्षे कारावास भोगावा लागेल. त्याने आतापर्यंत सहा वर्षे शिक्षा भोगली आहे.
कुख्यात शिकारी संसारचंदसोबत संबंध
पारधीचे कुख्यात शिकारी संसारचंदसोबत संबंध आहेत. तो वाघाची शिकार करणाऱ्या टोळीचा सक्रिय सदस्य आहे. ही टोळी मध्य भारतात कार्यरत आहे. त्याला गुन्हे करण्याची सवय आहे. पोलिसांनी अटक केल्यानंतर तो कारागृहातून पळून गेला होता. त्याला पकडून आणण्यासाठी पोलिसांना एक वर्ष परिश्रम घ्यावे लागले. त्याच्यावर एक लाख रुपयाचे इनाम घोषित करण्यात आले होते. सरकारने अशा गुन्हेगारांमुळे देशात वाघांची संख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.
वन्यजीवांविरुद्धचे गुन्हे पुढे येत नाहीत
माणसाविरुद्धचे गुन्हे तत्काळ पुढे येतात व त्या गुन्ह्यांचा शोधही लागतो. परंतु, घनदाट वनामध्ये वन्यजीवांविरुद्ध घडणारे गुन्हे सहज पुढे येत नाहीत आणि त्याचा शोध घेणेही फार कठीण असते. परिणामी, पारधीने संबंधित तीन गुन्ह्यांशिवाय आणखी किती गुन्हे केले असतील, किती वाघ व इतर वन्यप्राण्यांची शिकार केली असेल हे सांगता येणार नाही. त्याने संबंधित तीन गुन्हे वेगवेगळ्या ठिकाणी केले आहेत. त्यावरून त्याच्या गुन्हेगारीवृत्तीची व्यापकता सिद्ध होते, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.
सुधारण्याची शक्यता कमी
पारधी कुख्यात गुन्हेगार आहे. त्याला गुन्हे करण्याची सवय आहे. त्यामुळे कारागृहातून लवकर सोडले तरी, त्याच्यामध्ये सुधारणा होण्याची शक्यता कमी आहे. त्यापेक्षा अधिक काळ कारागृहात राहिल्यास त्याचे डोळे उघडतील. गुन्हे करणे चुकीचे आहे याची त्याला जाणीव होईल. त्याला प्रत्येक गुन्ह्यात किमान कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. कमाल शिक्षा ७ वर्षे कारावासाची आहे. त्याच्या गुन्ह्याची गंभीरता पाहता ही शिक्षा अधिक नाही, असेही न्यायालयाने हा निर्णय देताना स्पष्ट केले.