लाेकमत न्यूज नेटवर्क
नरखेड : शहरासह तालुक्यात मागील १८ दिवसांमध्ये काेराेनाच्या ३८ नवीन रुग्णांची नाेंद करण्यात आली. यात शहरातील रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे तालुक्यात काेराेना संक्रमण हळूहळू पुन्हा वाढत असल्याचे दिसून येते. तालुक्यातील ११ महिन्यात ११ काेराेना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रत्येकाने काेराेना संक्रमण टाळण्यासाठी उपाययाेजनांचे पालन करावे, असे आवाहन आराेग्य विभागाने केले आहे.
मागील ११ महिन्यात नरखेड तालुक्यातील ९१० रुग्ण काेराेना संक्रमित झाले हाेते. यात नरखेड शहरातील ३२७ तर ग्रामीण भागातील ५३८ रुग्णांचा समावेश हाेता. यातील ३१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यातील १६ रुग्णंची नाेंद तालुका आराेग्य अधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे. उर्वरित रुग्णांचा मृत्यू काेराेना काळात झाला असला तरी त्यांच्या मृत्यूला इतर आजार जबाबदार असल्याचेही तालुका आराेग्य अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले.
कोरोना रुग्णाची वाढती संख्या लक्षात घेता, कोरोना टेस्टचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. यासंदर्भात उपविभागीय अधिकारी श्रीकांत उंबरकर यांनी सर्व विभागातील अधिकाऱ्यांची विशेष बैठक घेऊन त्यात त्यांना आवश्यक सूचनाही केल्या हाेत्या तसेच प्रतिबंधात्मक उपाययाेजना करण्याचे आदेश दिले हाेते. दुसरीकडे, ग्रामीण भागातील नागरिकांनी सतर्क राहून सामाजिक कार्यक्रमावर मर्यादा ठेवाव्या. मास्कचा नियमित वापर करावा. गर्दी करणे व गर्दीत जाणे टाळावे. फिजिकल डिस्टन्सिंगचे काटेकाेर पालन करावे. भाजीपाला, फळ, दूध, दही विक्रेत्यांसह छाेट्या दुकानदारांनी मनात भीती न बाळगता स्वयंस्फूर्तीने काेराेना चाचणी करवून घ्यावी, असे आवाहन तालुका आराेग्य अधिकारी डाॅ. विद्यानंद गायकवाड यांनी केले.
....
पाेलीस भरतीपूर्व प्रशिक्षण
नरखेड शहरात पाेलीस भरतीपूर्व प्रशिक्षण शिबिराचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात तालुक्यातील काही तरुणांची प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली हाेती. या शिबिरातील तीन प्रशिक्षक, चार प्रशिक्षणार्थी व एका डाॅक्टरला काेराेनाची लागण झाल्याचे टेस्टनंतर निषन्न झाले हाेते, अशी माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय वनकडस यांनी दिली. तालुक्यात काेराेना लसीकरणाला २५ जानेवारीपासून सुरुवात करण्यात आली असून, आजवर ६३५ फ्रंट लाईन वाॅरियर्सचे लसीकरण पूर्ण करण्यात आल्याचे डॉ. दत्तात्रय वनकडस यांनी स्पष्ट केले.
...
दंडात्मक कारवाईला सुरुवात
वारंवार सूचना देऊनही नागरिक उपाययाेजनांचे पालन करीत नसल्यााने नरखेड नगर परिषद प्रशासनाने उपाययाेजनांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याची माेहीत सुरू केली आहे. या कारवाईमध्ये पालिकेतील काही कर्मचारी हयगय करीत असल्याचेही दिसून आले. स्थानिक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात काेराेना रुग्ण आढळून आल्याने त्यांनी नगर पालिका प्रशासनाकडे संपूर्ण कार्यालय सॅनीटाईज करून देण्याची मागणी केली हाेती. परंतु, ते कार्यालय अद्यापही सॅनिटाईझ करण्यात आले नाही. नव्याने आढळून आलेल्या सर्व काेराेना रुग्णांना त्यांच्याच घरी गृह विलिगीकरणात ठेवले आहे. अनेकांकडे स्वतंत्र खाेल्या नसल्याने संक्रमण वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नरखेड शहरासह ग्रामीण भागात काेविड केअर सेंटरची निर्मिती करणे गरजेचे आहे.