भिवापूर : नाफेडच्यावतीने भिवापूर शहरात हरभरा खरेदी केंद्र सुरू करण्यात येणार असून, ऑनलाईन नाेंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आली आहे. हरभरा विक्रीसाठी १०० शेतकऱ्यांचे अर्ज व सातबारा प्राप्त झाले आहेत. यातील ८० शेतकऱ्यांची नाेंदणी करण्यात आली आहे, अशी माहिती तालुका खरेदी-विक्री संघाचे सचिव सुरेश नागाेसे यांनी दिली. शासनाने हरभऱ्याची आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ५,१०० रुपये जाहीर केली असून, याच दराने नाफेडकडून हरभऱ्याची खरेदी केली जाणार असल्याचे सुरेश नागाेसे यांनी सांगितले.
शासकीय खरेदी केंद्रावर शेतमाल विकण्यासाठी आधी ऑनलाईन नाेंदणी करणे अनिवार्य आहे. हरभऱ्याच्या खरेदीसाठी साेमवार (दि. १५) पासून ऑनलाईन नाेंदणीला सुरुवात करण्यात आली आहे. यावर्षी नाफेडने हरभरा खरेदीसाठी भिवापूर तालुका खरेदी-विक्री संघाची निवड केली आहे. ऑनलाईन नाेंदणीसाठी शेतकऱ्यांनी त्यांचे सातबारा, बँक पासबुकची झेराॅक्स प्रत, माेबाईल क्रमांक व इतर आवश्यक कागदपत्रे खरेदी-विक्री संघाच्या कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे. कार्यालयीन यंत्रणेने नाेंदणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला त्याच्या माेबाईलवर हरभरा विक्रीबाबत शेड्यूल मॅसेज प्राप्त हाेताे. खरेदी शुभारंभाची तारीख अद्याप ठरायची आहे, असेही तालुका खरेदी-विक्री संघाचे सचिव सुरेश नागाेसे यांनी सांगितले.