योगेश पांडे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: आयएएस किंवा आयपीएस अधिकारी न झाल्याची मनात सल असल्याने नैराश्यात अन्न व औषधी प्रशासन विभागातील एका निरीक्षकाने नागपुरात आत्महत्या केली. संबंधित तरुण अधिकारी परभणी येथील निवासी होता. गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. शुभम सिद्धार्थ कांबळे (२५, वर्मानगर, गंगाखेड, परभणी) असे मृतक अधिकाऱ्याचे नाव आहे. २५ नोव्हेंबर रोजी सकाळी ते नागपुरात मित्राला भेटण्यासाठी आले व सेंट्रल एव्हेन्यू येथील हॉटेल राजहंस येथे खोली बुक केली. तेथील खोली क्रमांक ३११ मध्ये ते मुक्कामाला होते. २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास हॉटेलच्या लॅंड लाईन शुभमसाठी फोन आला.
हॉटेलचे मॅनेजर दिलीप बावणे यांनी फोन उचलला. त्यांनी रूमबॉयला कांबळे यांना आवाज देण्यासाठी पाठविले. मात्र खोलीतून काहीच प्रतिसाद आला नाही. मॅनेजरदेखील खोलीसमोर गेले व आवाज दिला. मात्र आतून काहीच आवाज आला नाही. अखेर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. गणेशपेठ पोलिसांच्या पथकाने तेथे येऊन दार उघडले असता शुभम कांबळे बेडवर बेशुद्ध पडले होते व खोलीतून रसायनाचा दुर्गंध येत होता. त्यांना उपचारासाठी मेयो इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. गणेशपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
- सुसाईड नोटमधून झाला खुलासा
खोली क्रमांक ३११ मध्ये पोलिसांना विविध रसायनांच्या चार ते पाच बाटल्या आढळून आल्या. तसेच सुसाईड नोटदेखील सापडली. मी स्वत:च्या मनाने आत्महत्या करत आहे. याला कुणीही जबाबदार नाही असे त्यात नमूद होते. आयएएस किंवा आयपीएस अधिकारी न झाल्याने मनात खंत असल्याने हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी लिहीले होते. पोलिसांनी प्राथमिक चौकशी केली असता कांबळे हे एफडीएमध्ये निरीक्षक असल्याची बाब समोर आली.
- खोलीतच तयार केले विषारी द्रव्य
कांबळे यांनी चार ते पाच बॉटल्समधील रसायनांचे मिश्रण करून हॉटेलच्या खोलीतच विषारी द्रव्य तयार केले. त्याच्याच प्राशनाने त्यांचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे. पोलिसांनी संबंधित बाटल्या तपासणीसाठी पाठविल्या आहेत. तसेच सविस्तर चौकशी सुरू आहे.