राकेश घानोडेनागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठामध्ये येत्या सोमवारपासून नवीन रोस्टरसह नियमित कामकाजाला सुरुवात होणार आहे. यासंदर्भात गुरुवारी नोटीस जारी करण्यात आली. न्यायालयाच्या उन्हाळी सुट्या रविवारी संपणार आहेत.
नवीन रोस्टरमध्ये द्विसदस्यीय न्यायपीठांचे न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांच्याकडे सर्व जनहित याचिका, सम वर्षांतील दिवाणी रिट याचिका, विदर्भातील न्यायालयांमधील पायाभूत सुविधांशी संबंधित याचिका, वाणिज्यिक न्यायालय कायद्यातील कलम १३ अंतर्गतचे अपील्स, न्यायमूर्तिद्वय विभा कंकणवाडी व वृषाली जोशी यांच्याकडे फौजदारी अपील्स, फौजदारी रिट याचिका, प्रथम अपील्स, कुटुंब न्यायालय अपील्स, अवमानना अपील्स तर, न्यायमूर्तिद्वय विनय जोशी व मुकुलिका जवळकर यांच्याकडे सर्व विषम वर्षांतील दिवाणी रिट याचिका, लेटर पेटेंट अपील्स आणि प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर व सीमाशुल्काशी संबंधित याचिका, अपील्स, अर्ज व संदर्भांचे कामकाज सोपविण्यात आले आहे.
एक सदस्यीय न्यायपीठातील न्या. नितीन बोरकर सम वर्षांतील दिवाणी रिट याचिका, न्या. गोविंद सानप फौजदारी रिट याचिका, फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ४८२ व ४०७ अंतर्गतचे अर्ज, फौजदारी व दिवाणी रिव्हिजन अर्ज, जिल्हा न्यायालयांकडून आलेले दिवाणी अवमान संदर्भ, न्या. अनिल पानसरे विषम वर्षांतील दिवाणी रिट याचिका, न्या. उर्मिला जोशी-फलके नियमित व अटकपूर्व जामीन अर्ज, आरोपीच्या निर्दोष मुक्तीविरुद्ध दाखल अपील्स, न्या. संजय देशमुख मोटर अपघात दाव्याशी संबंधित नसलेले सर्व प्रथम अपील्स व सम वर्षांतील द्वितीय अपील्स तर, न्या. महेंद्र चांदवाणी विषम वर्षांतील द्वितीय अपील्स व मोटर अपघात दाव्याशी संबंधित प्रथम अपील्सचे कामकाज पाहतील.