नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील कुलसचिवपदी नियुक्तीसाठी येत्या १९ जुलैपर्यंत पात्र उमेदवाराची निवड केली जाईल, अशी माहिती सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली.
यासंदर्भात कला व वाणिज्य रात्रकालीन महाविद्यालयाचे ग्रंथपाल (प्राध्यापक श्रेणी) अशोककुमार खोब्रागडे यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. दरम्यान, न्यायालयाने नियमित कुलसचिवाची नियुक्ती केव्हापर्यंत होईल अशी विचारणा केली असता, नागपूर विद्यापीठाने ही माहिती दिली. सध्या कुलसचिव कार्यालयाचे कामकाज प्रभारीच्या भरवशावर सुरू आहे. नियमित कुलसचिव नियुक्तीसाठी सप्टेंबर-२०१९ मध्ये प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. परंतु, कोरोना संक्रमणामुळे ही प्रक्रिया रखडली. दरम्यान, ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याऐवजी डॉ. अनिल हिरेखण यांची अवैधपणे प्रभारी कुलसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली, असे खोब्रागडे यांचे म्हणणे आहे. खोब्रागडे यांच्यातर्फे ॲड. आनंद परचुरे यांनी कामकाज पाहिले.