ताजबागमधील विकासकामांची नियमित पाहणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2018 12:59 AM2018-03-08T00:59:24+5:302018-03-08T00:59:37+5:30
मोठा ताजबाग येथील ताजुद्दीनबाबा दर्गा विकास आराखड्यातील कामांची तज्ज्ञ अभियंत्यांनी नियमित पाहणी करावी व पाहणीदरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटी वेळेवर दूर कराव्यात असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिलेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मोठा ताजबाग येथील ताजुद्दीनबाबा दर्गा विकास आराखड्यातील कामांची तज्ज्ञ अभियंत्यांनी नियमित पाहणी करावी व पाहणीदरम्यान आढळून येणाऱ्या त्रुटी वेळेवर दूर कराव्यात असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दिलेत.
यासंदर्भात ताज अहमद राजा व हाजी असलम खान यांनी जनहित याचिका दाखल केल्या होत्या. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व मुरलीधर गिरटकर यांनी हे आदेश देऊन दोन्ही याचिका निकाली काढल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत नवघरे यांनी न्यायालयाला अलिकडेच दिलेल्या माहितीनुसार, आराखड्यातील १८ पैकी ११ विकासकामे पूर्ण झाली असून ७ विकासकामे वेगात सुरू आहेत. सरकारने विकास आराखड्यासाठी १३२ कोटी रुपये मंजूर केले आहेत.
याचिकाकर्त्यांनी कामे संथ गतीने सुरू असल्याचा आरोप केला होता. ३० आॅगस्ट २०१३ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले होते. त्यानंतर विविध विकासकामांसाठी कंत्राटे देण्यात आली, पण विकासकामे अद्यापही पूर्ण झाली नाहीत. विकासकामांचा दर्जा चांगला नाही असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे होते. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. बी. एम. खान व अॅड. डॉ. ए. एच. जमाल, महापालिकेतर्फे अॅड. ए. एम. काझी तर, नासुप्रतर्फे अॅड. गिरीश कुंटे यांनी बाजू मांडली.