मौदा : वीजबिलाच्या थकबाकीमुळे महावितरण कंपनीने मौदा तालुक्यातील काही गावातील पाणी पुरवठा योजना तसेच पथदिव्यांचा वीजपुरवठा खंडित केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यात ग्रामपंचायतींना अडचणी येत आहेत. यासोबतच पथदिवे बंद असल्याने अपघाताच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे सरकारने याची दखल घेत ग्रामीण भागाला दिलासा द्यावा अशी मागणी करणारे निवेदन मौदा तालुका सरपंच सेवा संघाच्यावतीने पंचायत समितीचे खंड विकास अधिकारी दयाराम राठोड यांना शुक्रवारी देण्यात आले.
शासनाच्या निर्णयानुसार १५ व्या वित्त आयोगातून पाणीपुरवठा योजनांचे थकीत बिल ‘पीएफएमएस’ प्रणाली मार्फत अदा करण्याची ग्रामपंचायतींची तयारी आहे. मात्र ‘पीएफएमएस’ प्रणाली अद्यापही मौदा तालुक्यात सुरू झालेली नाही. त्याकरिता ग्रामपंचायतींना अवधी देण्यात यावा. पूर्वी पथदिव्यांचा विद्युत भरणा जिल्हा परिषद मार्फत केला जात होता. तीच पद्धत पुन्हा अमलात आणण्यात यावी अशी मागणी सरपंच संघटनेने केली आहे. निवेदन सादर करणाऱ्या शिष्टमंडळात सरपंच संघटनेचे अध्यक्ष व मारोडीचे सरपंच नीलकंठ भोयर, रेवरालचे सरपंच चिंतामण मदनकर, येसंबाचे सरपंच धनराज हारोडे, गांगनेरचे सरपंच प्रदीप राऊत, नंदापुरीचे सरपंच भूमेश्वर चाफले, कोदामेंढीचे सरपंच भगवान बावनकुळे, चाचेरचे सरपंच महेश कलारे, चिचोलीच्या सरपंच उज्वला चरडे, खराडा (पुनर्वसन) सरपंच रूपचंद केवट, दुधाळ्याचे सरपंच उमेश झलके, बानोरचे सरपंच वेंकट रामराव, नरसाळ्याचे सरपंच अजब टेकाम, आजनगाव सरपंच नीता पोटफोडे, माथनीच्या सरपंच सुनंदा बर्वे आदी उपस्थित होते.