लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खापरी गावठाणचे पुनर्वसन करताना पुनर्वसित करण्यात येणाऱ्या नागरिकांची अंतिम यादी आठ दिवसात प्रसिद्ध करून गाव चावडीवर लावावी आणि त्यानंतर प्राप्त आक्षेपांचा निपटारा करून २५ जूनपर्यंत नमुना भूखंड वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी अविनाश कातडे यांना दिले.मिहान पुनर्वसन आणि इतर विषयाची आढावा बैठक बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या (एमएडीसी) मध्यवर्ती सुविधा इमारतीच्या सभागृहात ७ जूनला घेण्यात आली. सभेत एमएडीसीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक सुरेश काकाणी उपस्थित होते.बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. मिहान कंपनीशी संबंधित विशाल सिक्युरिटी कंपनीच्या कामगारांच्या पीएफ संदर्भात प्रलंबित प्रकरणाचे निराकरण करण्यात यावे, असे निर्देश बावनकुळे यांनी भविष्य निर्वाह निधी विभागाचे अधिकारी श्रीवास्तव यांना दिले. याशिवाय मिहान प्रकल्पांतर्गत ज्या प्रकल्पग्रस्तांनी पुनर्वसनांतर्गत देय असणाºया नोकरीऐवजी पाच लाखांची उचल केली नाही, अशा एकूण ४७८ प्रकल्पग्रस्तांना व त्यांच्या पाल्यांना विकास कौशल्याचे प्रशिक्षण देण्यात यावे. तसेच त्यांना योग्यतेनुसार ७ ते १० हजार वेतनमान देण्यासाठी महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीच्या धर्तीवर योजना करून त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले.बैठकीत लक्ष्मीनगर झोनचे सभापती नगरसेवक प्रकाश भोयर, पंचायत समिती सदस्या रेखा मसराम, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील, मुख्य अभियंता समरेश चॅटर्जी, अधीक्षक अभियंता रजनी लोणारे, अतिरिक्त मुख्य वास्तुविशारद चंद्रशेखर बनकर, पणन व्यवस्थापक योगेश भारकर, वीज सल्लागार केशव इंगोले, जनसंपर्क अधिकारी दीपक जोशी, खापरी गावठाणातील प्रकल्पग्रस्त नागरिक, मिहान प्रकल्पात कार्यरत विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि एमएडीसीचे अधिकारी उपस्थित होते.