लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : कन्हान नदीला येणाऱ्या पुरामुळे बिना संगम (ता. कामठी) गावातील नागरिकांचे दरवर्षी माेठे नुकसान हाेते. त्यामुळे या गावाचे पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री नितीन राऊत यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
बिना संगम हे गाव कन्हान नदीच्या तीरावर असून, मागील वर्षी कन्हान नदीला आलेल्या पुरामुळे या गावाचे माेठे नुकसान झाले. राज्यातील युती सरकारने बिना गावाच्या पुनर्वसनासाठी वेकाेलिद्वारे ८४.७६ कोटी रुपये व महानिर्मितीद्वारे १२१.९६ कोटी अशा एकूण २०६.७२ कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. याला दोन वर्षं पूर्ण झाले. मात्र, निधी उपलब्ध झाला नाही. राज्य शासनाचा १९ सप्टेंबर २०१९ निर्णय विचारात घेता या गावाचे पुनर्वसन करावे, अशी मागणी या निवेदनात केली आहे. शिष्टमंडळात आ. टेकचंद सावरकर, भिवाजी तांडेकर, बंडू कापसे यांच्यासह नागरिकांचा समावेश हाेता.