नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) अंतर्गत उत्तर नागपूर मतदार संघातील नारीच्या मागील भागात शहरापासून दूर आडवळणाच्या जागेवर नारी ( खसरा क्र. १०९-११०/२,३)येथे बहुमजली पुनर्वसन वसाहत ७ वर्षांपूर्वी उभारण्यात आली असून येथे ५४४ गाळे आहेत. तर उप्पलवाडी-नारी येथे ८ वर्षांपूर्वी २३४ गाळे बांधण्यात आले. या वसाहतींना मुख्य रस्त्यांशी जोडणारा रस्ता नसल्याने येथील रहिवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
नारी व उप्पलवाडी या वसाहतीत शहरातील विविध प्रकल्पांमुळे बाधित झोपडपट्टीवासियांचे पुनर्वसन करण्यात आलेले आहे. येथे शहरात मोलमजुरी व इतर व्यवसाय करून गुजराण करणारी गरीब- श्रमिक कुटुंबे वास्तव्यास आहेत. परंतु, या वसाहतीला शहराशी जोडणारा रस्ताच नसल्यामुळे या नागरिकांना शहरात जाण्या-येण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. या वसाहतीला शहराशी जोडणारा रस्ता बनविण्याची मागणी शहर विकास मंचच्या वतीने मागील ४ वर्षांपासून प्रशासनाकडे सातत्याने करूनही रस्त्याची निर्मिती झालेली नाही.शहाराचा चौफेर विकास होत असताना दोन वसाहती मात्र विकासापासून अजूनही दूर आहेत.
शहराशी जोडणारा रस्ता तयार करा
उत्तर नागपुरातील नारी भागात उभारण्यात आलेल्या झोपडपट्टीवासियांच्या पुनर्वसन वसाहतीला शहराशी जोडणारा रस्ता तातडीने बनविण्याची मागणी शहर विकास मंचचे संयोजक अनिल वासनिक यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने महापालिकेचे आयुक्त राधाकृष्णण बी. व नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी यांना दिलेल्या निवेदनातून केली. या शिष्टमंडळात राजकुमार वंजारी, रामदास उईके, डाॅ. दिलीप तांबटकर, रंजना भगत, शैलेंद्र वासनिक, उत्तर नागपूर विकास आघाडीचे मुख्य संघटक आमप्रकाश मोटघरे आदींचा समावेश होता.