नागपूर : अनेक वर्षांपासून रखडलेल्या मॉडेल मिल चाळीच्या पुनर्वसनाला आता वेग मिळण्याची चिन्हे आहेत. चटई क्षेत्राच्या मुद्द्यावरून पुनर्वसन रखडले होते. मात्र नगररचना विभागाने तेथे २.५ इतके चटईक्षेत्र कायम ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे आता प्रशासकीय प्रक्रिया लवकर होऊन प्रत्यक्ष पुनर्वसन होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
१९९७ सालापासून हा मुद्दा रेंगाळत आहे. नॅशनल टेक्सटाईल कॉर्पोरेशनकडे याबाबत वारंवार पाठपुरावा करण्यात आला. २००९ साली करारनामा पत्राद्वारे कामगार चाळीच्या पुनर्विकास व पुनर्वसाहत करण्यासाठी एका असोसिएटला ही जागा देण्यात आली होती. ३२१ कामगारांचे पुनर्वसन करण्याच्या अटी शर्तीवर विक्री पत्र देण्यात आले होते. २०१६ साली महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियमातील कलम ३72 नुसार बेसिक चटईक्षेत्रात बदल करण्याचा निर्णय झाला व त्यामुळे पुनर्विकास रखडला. यासंदर्भात विविध पातळ्यांवर पाठपुरावा करण्यात आला. नागपूर महानगरपालिका व उपसंचालक नगर रचना विभाग नगररचना संचालनालय पुणे यांच्या अहवालानुसार मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २.५ इतकेच चटईक्षेत्र कायम ठेवण्यास मंजुरी दिली. यामुळे कामगारांना मोठा दिलासा मिळणार असल्याची माहिती माजी महापौर अर्चना डेहनकर यांनी दिली.
इतक्या वर्षांनंतर आता मोठा प्रश्न सुटला असल्याने पुढील प्रक्रियेला गती देण्याचे निर्देश देण्यात यावी, अशी मागणी मॉडेल मिल कामगार किरायेदार संघटनेचे अध्यक्ष पृथ्वीराज चिमणकर, मोहन बानाईत, सुरेश रामटेके, दीपक बनाईत, फुलचंद शंभरकर, विजय गुप्ता, अनिस शेख, दीपक ढोके, गुलाब बनकर, केशव श्रोते, अशोक मानकर, सतीश श्रीवास्तव, जगन श्रीवास्त नगराळे यांच्यासह मॉडेल मिल चाळ कामगार गणेश पेठ येथील सर्व रहिवाशांच्या वतीने करण्यात आली आहे.