न्यायालय : अपघातानंतर झाला होता दंगा नागपूर : कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोरली-राऊळगाव दरम्यान झालेल्या प्राणघातक अपघातानंतर दंगा भडकवल्याप्रकरणी तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डी. खोचे यांच्या न्यायालयाने १५ जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज बुधवारी फेटाळून लावला. हंसराज नामदेव राणे (४४), राहुल लहूजी जीवतोडे (२४), श्रावण रामकृष्णा मरसकोल्हे (२१), सौरभ दादाराव वाढी (२०), सचिन पूंजाराम भुरसे (२१), पुंजाराम पुरुषोत्तम भुरसे (४७), विजय मारोतराव वाडकर (३३), चेतन तेजराम मोरे (१९), विजय गजानन बुरण (२५), भारत रामकृष्णा जीवतोडे (२५), आकाश दादाराव नागपुरे (१९), दादाराव विठोबा नागपुरे (५४), रवींद्र विठोबा नागपुरे (३४) , सुभाष पांडुरंग भिंगारे (५५) सर्व रा. डोरली (भिंगारे) तहसील काटोल, कृष्णा प्रभाकर बाहेकर (३०) रा. राऊळगाव, अशी आरोपींची नावे आहेत. प्रकरण असे की, १४ फेब्रुवारी २०१६ रोजी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास डोरली गावातील नीलिमा दादाराव नागपुरे आणि चंद्रकला सीताराम लोखंडे या दोघी शतपावली करीत असताना त्यांना एमएच-३१-डीएस-०७९४ क्रमांकाच्या मॅक्झिमो महिंद्रा या मालवाहू वाहनाची धडक लागून नीलिमा नागपुरे या जागीच मरण पावल्या होत्या तर चंद्रकला लोखंडे या गंभीर जखमी झाल्या होत्या. घटनेच्या वेळी हे वाहन समीर कवडूजी मेश्राम (२४) रा. डोरली हा चालवीत होता. या अपघातानंतर गावातील या आरोपींचा समावेश असलेल्या ४०-५० जणांच्या एका संतप्त जमावाने वाहनचालक रवींद्र कवडूजी मेश्राम, अमर कवडूजी मेश्राम यांच्या घरावर धडक देऊन त्याला हातबुक्क्यांनी मारहाण केली होती. घरात घुसून तोडफोड आणि नासधूस केली होती. मेश्रामच्या घरापुढील टीव्हीएस ज्युपीटर मोपेड रस्त्यावर आणून उलटवली होती. मॅक्झिमो महिंद्रा आणि मेश्राम यांच्या मालकीचे ग्रामपंचायत कॉम्प्लेक्समधील किराणा दुकान पेटवून दिले होते. या जमावाने ७ लाख ७५ हजार रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान केले होते. या प्रकरणी प्राप्त तक्रारीवरून कळमेश्वर पोलिसांनी रवींद्र नागपुरे याच्यासह ५० जणांविरुद्ध भादंविच्या १४३, १४७, १४९, ३३६, ४३५, ४३६, ४५२, ४२७, ३२३ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. पंधरा आरोपींनी अॅड. ए. ए. मार्डीकर यांच्यामार्फत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केले होते. ते न्यायालयाने फेटाळून लावले. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील पंकज तपासे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)
१५ जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2016 3:20 AM