न्यायालय : विवाहितेचा छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे प्रकरणनागपूर : जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाबादीपसिंगनगर येथील एका विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश टी. एस. अकाली यांच्या न्यायालयाने लष्करी जवानासह सहा आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. अलोप वसंत चौधरी (३१), वसंत शंकरराव चौधरी (५९), सुमित्रा वसंत चौधरी (५६), चेतन वसंत चौधरी (३२), श्रद्धा चेतन चौधरी आणि अनुप वसंत चौधरी (३१) सर्व रा. गौतमनगर, अशी आरोपींची नावे आहेत. एकता अलोप चौधरी, असे मृत विवाहितेचे नाव होते. या प्रकरणातील फिर्यादी सचिन भीमराव जांभूळकर यांची एकता ही बहीण होती. २०१५ मध्ये तिचा विवाह अलोप याच्यासोबत झाला होता. अलोप हा भारतीय संरक्षण दलात जम्मू येथे तैनात होता. विवाहनंतर त्याने एकताला जम्मू येथे नेले होते. या ठिकाणी अलोपने एकताला मोटरसायकल घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्यास सांगितले होते. तिने माहेरची आर्थिक परिस्थिती ठिक नसल्याचे सांगितले होते. परिणामी त्याने तिचा छळ सुरू केला होता. ही बाब अलोपने आपल्या घरीही सांगितली होती. अलोप आणि एकता नागपुरात परतल्यानंतर सासरची मंडळी तिचा मानसिक व शारीरिक छळ करू लागले होते. एकताने होणाऱ्या छळाबाबत भाऊ, बहीण, आई आणि मैत्रिणींना सांगितले होते. छळ असह्य झाल्याने एकताने गौतमनगर येथील आपल्या राहते घरी २४ फेब्रुवारी २०१६ रोजी ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली होती. सचिन जांभूळकर यांच्या तक्रारीवरून जरीपटका पोलिसांनी भादंविच्या ३०६, ४९८-अ, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला असता अटक टाळण्यासाठी सर्व सहाही आरोपींनी न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. प्रकरण गंभीर असल्याने सर्वांचे अर्ज न्यायालयाने फेटाळून लावले. न्यायालयात सरकार पक्षाच्यावतीने अतिरिक्त सरकारी वकील दीपक गादेवार यांनी काम पाहिले. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक एस. आर. डोंगरे हे आहेत. (प्रतिनिधी)
लष्करी जवानासह सहा जणांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2016 2:47 AM