खुनानंतर मृतदेह फेकला होता गोंडखैरीच्या रस्त्यावरनागपूर : कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कॉलगर्लच्या खूनप्रकरणी पहिले तदर्थ न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. व्ही. दीक्षित यांच्या न्यायालयाने एका आरोपीचा जामीन अर्ज फेटाळून लावला. राहुल मुरलीधर टाके (२२), असे आरोपीचे नाव असून तो कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निमजी येथील रहिवासी आहे. सुरेखा ऊर्फ शनू देवेंद्र बोरकर, असे मृत महिलेचे नाव होते. ती जरीपटका भागातील रहिवासी होती. प्रकरण असे की, ९ आॅगस्ट २०१५ रोजी अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील गोंडखैरी येथील पेट्रोल पंपनजीक रस्त्याच्या कडेला एका अंदाजे ३० वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला होता. गणपत नारायण अतकरी या व्यक्तीच्या सूचनेवरून कळमेश्वर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी शासकीय इस्पितळाकडे रवाना केला होता. उत्तरीय तपासणी अहवालात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी गळा दाबल्याने मृत्यू, असा अभिप्राय देताच कळमेश्वर पोलिसांनी भादंविच्या ३०२, २०१ (पुरावा नष्ट करणे) गुन्हा दाखल केला होता. सायबर सेलच्या माध्यमातून मृत महिलेची ओळख पटली होती. त्यानंतर संपूर्ण खुनाचा पर्दाफाश झाला होता. पोलिसांनी राहुल टाके आणि फेटरी येथील रहिवासी कोमल मदन पौनीकर या दोघांना मध्य प्रदेशच्या सिहोर येथील एका गावात अटक केली होती. गुन्ह्यात भादंविच्या १२० (ब) (कट रचणे) या कलमाची वाढ करण्यात आली होती. मृत सुरेखा बोरकर ही देह व्यापारात गुंतलेली होती. तिने आरोपी कोमलची अश्लील व्हिडिओ क्लिपिंग तयार करून तिला या व्यवसायात ओढले होते. पुढे पैशाच्या देवाणघेवाणवरून दोघींमध्ये भांडणे होऊ लागली होती. ८ आॅगस्ट २०१५ रोजी कोमलने सुरेखा हिला राहुल टाकेच्या मदतीने घरी बोलावले होते. चहातून झोपेच्या गोळ्या देऊन ओढणीने गळा आवळून तिचा खून केला होता. नंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने दोघांनी तिला मोटरसायकलवर मध्ये बसवून मृतदेह गोंडखैरी भागात फेकून दिला होता. २५ आॅगस्टपासून राहुल आणि कोमल हे कारागृहात आहेत. त्यांच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. राहुल टाके याने जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. साक्षीदारांवर दबाव आणण्याची शक्यता असल्याने न्याचा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील विलास राऊत यांनी काम पाहिले. सहायक पोलीस निरीक्षक एस. एम. घोनमोडे हे तपास अधिकारी आहेत.(प्रतिनिधी)
कॉलगर्ल खूनप्रकरणी आरोपीचा जामीन फेटाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2016 3:00 AM