नागपूर : कळमना येथे निर्घृणपणे हत्या करण्यात आलेल्या तीन नाथजोगींच्या वारसदारांना संख्येनुसार भरपाई देण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नकार देऊन संबंधित अवमानना याचिका खारीज केली.न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी नुकताच हा निर्णय दिला. समाजसेवक दीनानाथ वाघमारे यांनी ही याचिका दाखल केली होती. ११ डिसेंबर २०१४ रोजी उच्च न्यायालयाने मयत नाथजोगी हसन दादाराव सोलंकी, सुपडा मगन नागनाथ व पंजाबराव भिकाजी शिंदे यांच्या वारसदारांना २४ आॅगस्ट २००४ व १ डिसेंबर २००८ रोजीच्या ‘जीआर’अनुसार भरपाई देण्याचा आदेश शासनास दिला होता. त्यानुसार शासनाने मयतांच्या वारसदारांना प्रत्येकी पाच लाख रुपये भरपाई दिली. यावर याचिकाकर्त्याचा आक्षेप होता. मयताच्या प्रत्येक वारसदाराला पाच लाख रुपये भरपाई मिळायला पाहिजे. १० वारसदार असतील तर, ५० लाख रुपये भरपाई द्यायला पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. परिणामी त्यांनी अवमानना याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिकाकर्त्याचे म्हणणे तथ्यहीन ठरविले. कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर संबंधित कुटुंबाला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यासाठी शासनातर्फे भरपाई दिली जाते. मोटर वाहन कायदा-१९८८ व कामगार भरपाई कायदा-१९८७ अंतर्गतही भरपाई देताना मयताचे किती वारसदार आहेत याचा विचार केला जात नाही असे न्यायालयाने याचिका फेटाळताना स्पष्ट केले. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. निहालसिंग राठोड तर, शासनातर्फे मुख्य वकील भारती डांगरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)अशी घडली घटनामहिलांची वेशभूषा करून विविध शहरांत भिक्षा मागणे हा नाथजोगी समाजाचा पारंपरिक व्यवसाय आहे. २०१२ मध्ये हे हत्याकांड घडले तेव्हा नागपुरात चोऱ्यांचे सत्र सुरू होते. नागरिक धास्तावलेले होते. कळमना हद्दीतील भरतवाडा येथे चार नाथजोगी महिलांची वेषभूषा करीत असताना ते चोर असल्याची अफवा परिसरात पसरली. नागरिकांनी एकत्र येऊन चौघांवरही हल्ला चढवला. या हल्यात हसन दादाराव सोलंकी (२५), पंजाबराव भिकाजी शिंदे (३०) व सुपडा मगन नागनाथ (४५) हे तिघे जागीच ठार झाले, तर पंजाबराव सोलंकी (४०) थोडक्यात बचावला. चारही नाथजोगी बुलडाणा जिल्ह्यातील मोहिदेपूर (ता. जळगाव जामोद) येथून आले होते.
नाथजोगींच्या वारसदारांना संख्येनुसार भरपाईस नकार
By admin | Published: November 02, 2016 2:49 AM