नागपूर : मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका विवाहित महिलेची फसवणूक करून बलात्कार केल्याप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. भालेराव यांच्या न्यायालयाने एका आरोपीचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. शेख हाफीज शेख मजीद (३३), असे आरोपीचे नाव असून तो ताजनगर येथील रहिवासी आहे. प्रकरण असे की, पीडित महिला ही ३० वर्षांची आहे. ती आपले पती आणि मुलासोबत वैवाहिक जीवन जगत असताना तिच्यावर हाफीज शेख याची वाईट नजर होती. त्याने या पीडित महिलेला लग्नाचे आमिष दाखवून आणि तिच्या मुलास ठार मारण्याची धमकी देऊन अस्तित्वात असलेल्या पतीपासून तिचा तलाक घडवून आणला होता. त्यानंतर तिच्याशी निकाह केल्याचा बनावट निकाहनामा तयार केला होता. हा निकाहनामा खरा असल्याचे भासवून त्याने तिच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले होते. त्यामुळे ती तीन महिन्यांची गरोदरही होती. ही बाब हाफीज शेख याला समजताच त्याने पीडित महिलेस पत्नी म्हणून ठेवण्यास नकार दिला होता. आरोपी हाफीजच्या या बनवाबनवीमुळे ती आपल्या पहिल्या पतीपासून दुरावली होती , या शिवाय तिचे संपूर्ण आयुष्यच बर्बाद झाले होते. पीडित महिलेच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी १७ आॅक्टोबर २०१५ रोजी शेख हाफीज याच्याविरुद्ध भादंविच्या ४२०, ३७६, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. अटक टाळण्यासाठी त्याने न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. प्रकरण गंभीर असल्याचे लक्षात येताच न्यायालयाने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला. न्यायालयात सरकारच्यावतीने मुख्य अतिरिक्त सरकारी वकील नितीन तेलगोटे, फिर्यादी पीडित महिलेच्या वतीने अॅड. लुबेश मेश्राम तर आरोपीच्या वतीने अॅड. सलीम खान यांनी काम पाहिले.(प्रतिनिधी)
फसवणूक करून बलात्कार अटकपूर्व जामीन फेटाळला
By admin | Published: October 29, 2015 3:18 AM