नागपूर : काेराेनामुळे लावलेल्या टाळेबंदीच्या काळात राेजगार गमावलेले, गरीब, निराधार व आजारग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी तरुणांच्या ग्रुपने मदत सत्र सुरू केले आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यासाठी वर्गणीतून उभारलेला निधी या सत्कार्यासाठी खर्ची घातला जात आहे.
गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या काेराेनाच्या प्रकाेपावर नियंत्रणासाठी लाॅकडाऊन आणि कठाेर निर्बंध लावण्यात आले आहेत. मात्र या परिस्थितीमुळे अनेकांना देशाेधडीला लावले आहे. बहुतेकांचा राेजगार गेला आहे तर, अनेक कुटुंबांनी आजारामुळे कर्ती माणसे गमावली आहेत, ज्यांच्याकडे कर्ता कुणी नाही असे अनेक वृद्ध भान हरपले आहेत. अशा आधार व राेजगार गमावलेल्या गरीब, गरजू लाेकांच्या मदतीसाठी तरुणांनी हात पुढे केला आहे. सामाजिक कार्यकर्ता अनिकेत कुत्तरमारे याच्या नेतृत्वात तरुणांची टीम हे कार्य करीत आहे. दक्षिण नागपूर परिसरातील गरीब वस्तीत हे तरुण मदतीसाठी फिरत आहेत. वस्त्यांमधील अतिशय गरजू व्यक्तींना शाेधून त्यांच्यापर्यंत मदत पाेहोचविली जात आहे. बंद लिफाफ्यात ७०० रुपये टाकून दान स्वरूपात ही मदत वितरित केली जात आहे. बाबासाहेबांच्या जयंतीवर हाेणारा आर्थिक खर्च टाळत ही मदत दिली जात असल्याने परिस्थितीमुळे नडलेल्या कुटुंबांना थाेडा का हाेईना दिलासा मिळत आहे. या तरुणांनी इंदिरानगर, काैशल्यानगर, सावित्रीबाई फुलेनगर, रामबाग, शताब्दी चाैक परिसरात फिरून १५० हून अधिक नागरिकांना मदत केली आहे. या उपक्रमाचे सर्वत्र काैतुक केले जात आहे.