निशांत वानखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भविष्यात मानवाला सुरक्षितपणे जीवन जगण्यासाठी पर्यावरणाच्या संवर्धनाची नितांत गरज आहे. विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत, त्यामुळे त्यांच्यापर्यंत हे महत्त्व समजणे अगत्याचे आहे. मात्र पर्यावरणाबद्दल नुसते बोलण्याने फरक पडणार नाही, तर नैसर्गिक घडमोडींमध्ये त्यांचा सहभाग वाढणे आवश्यक आहे. या विचाराचे महत्त्व समजून विद्यार्थ्यांना निसर्गाशी जोडण्याचे काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयातील ‘नेचर क्लब’ने गेल्या आठ वर्षांपासून चालविले आहे.नेचर क्लबची सुरुवात महाविद्यालयातील जीवशास्त्र विभागाच्या प्राध्यापिका डॉ. अर्चना मेश्राम यांनी केली. त्या स्वत:ही वन्यजीव प्रेमी म्हणून प्रसिद्ध आहेत, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत करण्यासाठी त्यांनी हा अनोखा क्लब तयार केला. सुरुवातीला त्यांच्या विभागातीलच केवळ १५ विद्यार्थी यामध्ये सहभागी होते. मात्र जसजसे नेचर क्लबचे काम सुरू झाले तसे विधी विभाग, बीबीए, बीसीए, कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील पदवी अभ्यासक्रमाचे विद्यार्थी जुळत गेले आणि आज २५० विद्यार्थ्यांची मोठी टीमच तयार झाली. नुसता क्लब तयार करणे हे लक्ष्य नव्हते तर या टीमला प्रोत्साहित करणारा कार्यक्रमच डॉ. मेश्राम यांच्याकडे होता. याअंतर्गत महाविद्यालयात पर्यावरण तज्ज्ञांचे गेस्ट लेक्चर आयोजित करण्यासह वनविभागातर्फे निर्मित डॉक्युमेंटरी फिल्मचे प्रदर्शन आयोजित करणे सुरू केले. पर्यावरण संदर्भातील वेगवेगळे दिवस साजरे करणे, शाळा-महाविद्यालयांमध्ये पोस्टर व छायाचित्र स्पर्धा घेणे आणि प्रदर्शन भरविण्याचे उपक्रम घेतले जातात. विविध शाळांमध्ये जाऊन वनविभागाच्या डॉक्युमेंटरी दाखविण्यासह विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाबाबत मार्गदर्शन आणि प्रोत्साहन देण्याचे काम क्लबचे सदस्य उत्साहाने करतात.पर्यावरण म्हणजे नुसती झाडे आणि वाघ नाही. जंगल असो की जंगलाबाहेरचा भाग, त्यामध्ये असंख्य सजीवांची अन्नसाखळी राहते. या अन्नसाखळीची प्रत्यक्ष ओळख विद्यार्थ्यांना व्हावी म्हणून अनेक उपक्रम क्लबतर्फे राबविले आहेत. पक्षी निरीक्षण हा क्लबचा नित्याचा उपक्रम. यासह विद्यार्थ्यांसाठी जंगल सफारीचे आयोजन, शहरात पथनाट्याद्वारे जनजागृती आणि जंगला शेजारच्या गावांमध्येही मार्गदर्शक उपक्रम राबवून जनजागृतीचे अभियान क्लबच्या विद्यार्थ्यांनी नियमितपणे राबविले असल्याचे डॉ. मेश्राम यांनी सांगितले. ठिकठिकाणी वृक्षारोपण, जंगलामध्ये जाऊन प्लास्टिक गोळा करण्यात येते. शिवाय दरवर्षी विसर्जनाच्या वेळी निर्माल्य गोळा करणे आणि तलावाची सफाई करण्याचे कामही क्लबचे विद्यार्थी उत्साहाने करताना दिसतात. असे अनेक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना जुळवून ठेवण्याचे काम डॉ. मेश्राम यांनी केले आहे.
पक्षी निरीक्षणाची आंतरराष्ट्रीय दखलनेचर क्लबच्या विद्यार्थ्यांनी दीक्षाभूमी परिसरात वेगवेगळ््या ऋतूंमध्ये आढळणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण केले व त्यांची वैज्ञानिक माहिती गोळा केली. महाराष्ट्र राज्य वनविभागाने ही संपूर्ण माहिती पुस्तकरूपात प्रकाशित केली. विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये नेचर क्लबचे दोन शोधनिबंध प्रकाशितही करण्यात आले. यासोबतच क्लबच्या निरीक्षणानुसार अंबाझरीच्या चितमपल्ली पक्षी पार्कमध्ये १६१ प्रजातीचे पक्षी आढळून आले असून त्यामधील १०५ पक्षी स्थानिक तर ५६ प्रवासी पक्षी असल्याची नोंद करण्यात आली आहे. हा शोधनिबंधही इंडियन जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आल्याचे डॉ. मेश्राम यांनी सांगितले.
वनविभागाशी एमओयूनेचर क्लबने सात वर्षांपूर्वी महाराष्ट्र वनविभागाशी एमओयू साईन केला आहे. याअंतर्गत शाळामहाविद्यालयांमध्ये वन्यजीव सप्ताह साजरा करणे, विद्यार्थ्यांसाठी वॉल पेंटिंग, वादविवाद स्पर्धा, प्रश्नमंजूषा घेणे, पॉवर पॉइंट प्रेझेन्टेशन तसेच विविध जनजागृतीपर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.