लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : दोन मुलांना जन्म देऊन अचानक बाळंतीणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडवून दिलेले प्रकरण शांत होत नाही तोच गुरुवारी रात्री झालेल्या अर्भकाचा मृत्यूने नातेवाईकांनी डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात गोंधळ घातला. डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करीत नातेवाईकांनी तहसील पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली. विशेष म्हणजे, शुक्रवारी अर्भकाच्या शवविच्छेदनासाठी आवश्यक दस्तावेजासाठी मृताच्या वडिलांना तब्बल चार तास बसवून ठेवण्याचा प्रकारही समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.मिळालेल्या माहितीनुसार, पारडी रहिवासी ओमलाल चंदनमलागर यांच्या पत्नीने बुधवारी डागा रुग्णालयात एका बाळाला जन्म दिला. गुरुवारी दुपारी अर्भकाची प्रकृती अचानक खालवली. नातेवाईकांनी डॉक्टरांना याची माहिती दिली. परंतु डॉक्टर आले नाही. सायंकाळी प्रकृती अत्यवस्थ झाल्याने नातेवाईक अर्भकाला घेऊन डॉक्टरांच्या खोलीत गेले, त्यांनी १० मिनिटात येतो असे सांगून जागेवर जाण्यास सांगितले, परंतु डॉक्टर २० मिनिटांनंतर आले. त्यांनी तपासणी करताच अतिदक्षता विभागात घेऊन जाण्यास सांगितले. अतिदक्षता विभागात नेत असतानाच वाटेतच अर्भकाचा मृत्यू झाला. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे अर्भकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी गोंधळ घातला. रात्री उशिरा तहसील ठाण्यात डॉक्टर विरोधात तक्रारही दाखल केली.शुक्रवारी मेयो रुग्णालयात अर्भकावर शवविच्छेदन होणार होते. परंतु मृताचे वडील ओमलाल यांच्याकडे आवश्यक दस्तावेज नव्हते. त्यासाठी ते डागा रुग्णालयात गेले. मात्र येथील डॉक्टरांनी दस्तावेज देण्यासाठी तब्बल चार तास ओमलाल यांना बसवून ठेवले. या संदर्भाची तक्रार त्यांनी नगरसेवक पुरुषोत्तम हजारे यांच्याकडे केली. हजारे यांनी या प्रकरणात चौकशी करण्याची व दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला.
नागपुरात अर्भकाच्या मृत्यूने नातेवाईकांचा गोंधळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 12:17 AM
दोन मुलांना जन्म देऊन अचानक बाळंतीणीचा मृत्यू झाल्याने खळबळ उडवून दिलेले प्रकरण शांत होत नाही तोच गुरुवारी रात्री झालेल्या अर्भकाचा मृत्यूने नातेवाईकांनी डागा स्मृती शासकीय स्त्री रुग्णालयात गोंधळ घातला.
ठळक मुद्देडागा रुग्णालय : मृत्यूचे दस्तावेज देण्यासाठी लावले चार तास