लाेकमत न्यूज नेटवर्क
कामठी : पाेलिसांनी शहरातील संंजयनगर भागात केलेल्या कारवाईमध्ये गुरांची अवैध वाहतूक करणारे छाेटे मालवाहू वाहन पकडले. यात वाहनचालक पळून गेला असून, पाेलिसांनी वाहनातील १२ जनावरांची सुटका करीत त्यांना सुरक्षित स्थळी पाेहाेचविले. शिवाय, ६ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई साेमवारी (दि. १७) रात्री ११.३० वाजेच्या सुमारास करण्यात आली.
कामठी (जुनी) पाेलिसांचे पथक गस्तीवर असताना त्यांना शहरातून गुरांची वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली हाेती. त्यामुळे त्यांनी संजयनगर भागातून जाणाऱ्या एमएच-४०/बीएल-११४१ क्रमांकाच्या छाेट्या मालवाहू वाहनाच्या वाहनचालकास थांबण्याचा इशारा केला. मात्र, त्याने वाहनाचा वेग वाढवून पळ काढला. काही अंतरावर त्याने वाहन उभे केले आणि अंधाराचा फायदा घेत वाहन साेडून पळून गेला. झडतीदरम्यान त्या वाहनात १२ जनावरे काेंबली असल्याचे पाेलिसांच्या निदर्शनास आले.
ती गुरांची अवैध वाहतूक असून, ती सर्व जनावरे कामठी शहरातील कत्तलखान्यात नेली जात असल्याचे चाैकशीत स्पष्ट हाेताच पाेलिसांनी त्या वाहनातील सर्व जनावरांची लगेच सुटका केली आणि त्यांना पारडी, नागपूर येथील गाेरक्षणमध्ये पाठविण्याची व्यवस्था केली. शिवाय, वाहन जप्त केले. या कारवाईमध्ये ४ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन आणि १ लाख ८० हजार रुपये किमतीची १२ जनावरे, असा एकूण ३ लाख ३० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला, अशी माहिती ठाणेदार राहुल शिरे यांनी दिली. याप्रकरणी कामठी (जुनी) पाेलिसांनी गुन्हा नाेंदवून तपास सुरू केला आहे. ही कारवाई महेश कठाणे, पंकज मारशिंगे, विजय सुभेकर, दिलीप ढगे, शीतलप्रसाद मिश्रा यांच्या पथकाने केली.