लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : उत्तर विदर्भात कमी पावसामुळे व मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे पाणीटंचाईचा निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच धरणात पाच टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे केली.नवी दिल्लीत मुख्यमंत्री चौहान व पालकमंत्री बावनकुळे यांची केंद्रीय कोळसामंत्री पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत चर्चा झाली. मध्यप्रदेशमधील चौराई धरणामुळे पेंचमधील पाणीसाठा कमी झाला असून त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा दुष्काळ निर्माण होण्याची भीती निर्माण झाली आहे. पेंचमधून नागपूर व भंडारा जिल्ह्याला पिण्यासाठ़ी पाणीपुरवठा करण्यात येतो. नागपूर व भंडाऱ्यातील ३० लाख लोकसंख्येला टंचाईचा सामना करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत चौराई धरणातून पाच टीएमसी पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी विनंती मुख्यमंत्री चौहान यांना करण्यात आली.चौराई जलाशयाचे काम यंदा पूर्ण झाले असून या जलाशयात ६० टक्के पाणी आहे. शिवाय चौराईच्या शेजारील भाग अजूनही विकसित झाला नाही. त्यामुळे उपलब्ध असलेल्या पाण्यातून ५ टीएमसी पाणी नागपूर आणि भंडारा जिल्ह्यासाठी सोडण्यात यावे. मध्यप्रदेशचा पाणीपुरवठा विस्कळीत न होता, हे पाणी महाराष्ट्राला देण्यात यावे, याकडेही बावनकुळे यांनी लक्ष वेधले.सावनेरचा विकास आराखडा रखडला बावनकुळे यांनी दिल्लीत कोळसामंत्री पीयूष गोयल यांचीही भेट घेतली. सावनेर शहरासह परिसराचा ८० टक्के भाग हा कोळसा खाणीसाठी आरक्षित करण्यात आला असल्यामुळे सावनेरचा विकास आराखडा मंजूर होऊ शकला नाही. कोळसा खाणीसाठी आरक्षण करण्यात आले. पण अजूनपर्यंत कोणतेही भूसंपादन वेकोलिने केलेले नाही. त्यामुळे शेतकरी आणि शहरातील नागरिक अडचणीत सापडले आहे. तसेच शहराचा विकास आराखडा मंजूर करण्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत, याकडे बावनकुळे यांनी कोळसामंत्री पीयूष गोयल यांचे लक्ष वेधले.आदासा खाणीचे काम सुरू नाही आदासा खाणीसाठी २०५.४६ हेक्टर जमीन भूसंपादित करण्यात आली. पण आजपर्यंत कोणतेही काम सुरु झाले नाही आणि भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांसाठी कोणताही करार करण्यात आला नाही. हेवती आणि मकरधोकडा या दोन्ही गावांचे पुनर्वसनही झाले नाही. हे दोन्ही विषय लवकर सोडविण्यात यावे, अशी विनंतीही कोळसा मंत्र्यांना करण्यात आली. याशिवाय कामठी रेल्वे स्टेशन आणि जवळच्या रेल्वे स्टेशनच्या समस्यांवरही दोन्ही मंत्र्यांची चर्चा झाली.
पेंचमध्ये पाच टीएमसी पाणी सोडावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 20:37 IST
उत्तर विदर्भात कमी पावसामुळे व मध्य प्रदेशातील चौराई धरणामुळे पाणीटंचाईचा निर्माण झालेला धोका टाळण्यासाठी नागपूर जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पेंच धरणात पाच टीएमसी पाणी सोडण्यात यावे, अशी विनंती ऊर्जामंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्याकडे केली.
पेंचमध्ये पाच टीएमसी पाणी सोडावे
ठळक मुद्देबावनकुळे यांची मागणी : शिवराज सिंग चौहान यांच्याशी चर्चा