मुंबई- हिंदी सिनेसृष्टीतील काही अभिनेत्यांनी आपल्या बहारदार अभिनयशैलीने रसिकांवर मोहिनी घालण्याचे काम केले आहे. देव आनंद, शम्मी कपूर, राजेश खन्ना, ऋषी कपूर, शाहरुख खान या सुपरस्टार्सची सिनेप्रेमींमध्ये प्रचंड क्रेझ आहे. त्यांच्या लोकप्रियतेचे गमक उलगडणाऱ्या 'प्यार का राग सुनो' या पुस्तकाचे प्रकारशन ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट यांच्या हस्ते करण्यात आले आहे. विले पार्ले येथील लोकमान्य सेवा संघ आणि एजेस फेडरलतर्फे आयोजित करण्यात आलेल्या समारंभात 'प्यार का राग सुनो' हे द्वारकानाथ संझगिरी, मीना कर्णिक आणि हेमंत कर्णिक लिखित पुस्तक प्रकाशित करण्यात आले. या सोहळ्याला ज्येष्ठ दिग्दर्शक महेश भट प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
यावेळी मीना कर्णिक आणि द्वारकानाथ संझगिरी यांनी पुस्तक तयार करतानाचे अनुभव सांगितले. संझगिरी पहिल्यापासून देव आनंदचे चाहते आहेत. मीना कर्णिक यांनी मागील दोन वर्षांमध्ये देव आनंद यांचे सिनेमे बघितले. त्यांना शाहरुख आणि देव आनंदमध्ये बऱ्याच गोष्टी सारख्या वाटल्या. हा धागा पकडून पुस्तक लिहायचे नक्की झाल्यावर राज कपूर यांचे चाहते असलेले मीना यांचे बंधू हेमंत कर्णिक सोबतीला आले. तिघांनी चर्चा, संवाद आणि अभ्यासाद्वारे 'प्यार का राग सुनो' लिहिले आहे. यात देव आनंद ते शाहरुखपर्यंतचा रोमँटिक प्रवास उलगडला आहे. शम्मी, शशी, ऋषी हे तीन कपूर आणि राजेश खन्नांचाही परामर्ष घेतला गेला आहे. नूतन आसगावकर यांनी या पुस्तकासाठी खूप मेहनत घेतली असून, गौतम राजाध्यक्ष यांनी काढलेल्या छायाचित्रांमुळे पुस्तक अधिकच सुंदर बनले आहे. 'प्यार का राग सुनो' हे पुस्तक आणि विषय आवडल्याचे सांगत महेश भट म्हणाले की, स्वातंत्र्य मिळाल्यावर सगळीकडेच आनंद, जिव्हाळा, आपुलकी, प्रेम आणि पवित्र वातावरण होते. त्यातून प्रतिभाशाली निर्माते, दिग्दर्शक आणि सिने तारे-तारका यांनी एक खास वातावरण तयार केले. त्यात निरागसता होती. चित्रपट असोशीने काढले जात होते. प्रेम आणि प्रणयाला प्राधान्य दिले जात होते. या पुस्तकातील नायकांमधील देव आनंद, राजेश, ऋषी आणि शाहरुख यांच्यासोबत मी वावरलो आहे. त्यांचे वलय अनुभवले आहे. माझ्या आईला चित्रपट आणि गाण्यांचे खूप वेड होते. मला त्याचे नवल वाटायचे. ती म्हणायची तू जेव्हा वयात येशील तेव्हा तुला हे वेड समजेल आणि पुढे तसेच झाले. मला वाटते की, तो काळ परत आणायला हवा. त्यादृष्टीने हे पुस्तक प्रेरणादायी वाटते. 'प्यार का राग सुनो...' या लोकप्रिय गाण्यावर आधारलेले शीर्षक असलेले हे पुस्तक सर्वाना आवडेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.
पुस्तक प्रकाशनानंतर पाच हीरोंसह शशी कपूर आणि अमिताभ बच्चन यांची काही गाणी सादर केली गेली. राजेश आजगावकर आणि द्वारकानाथ संझगिरी यांनी निवेदन करत आणि दृकश्राव्य माध्यमातून गाण्यांना उठाव आणला. राणा चटर्जी, डॉ. जय आजगावकर आणि प्राजक्त सातर्डेकर यांनी गाणी सादर केली. संजय मराठे आणि वादकांनी साथ केली. लोकमान्य सेवा संघाने १०१वा वर्धापन दिन साजरा करत हे पहिले पुष्प रसिकांना अर्पण केले.