फ्रान्सच्या डसॉल्ट, एमबीडीए, सॅफरॉनसोबत करार : १२,५०० नवीन रोजगाराच्या संधीनागपूर : मिहान-सेझमधील रिलायन्स एडीएजीच्या प्रस्तावित धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कमध्ये निर्मिती प्रकल्प स्थापन करण्यासाठी रिलायन्स डिफेन्सने फ्रान्सच्या डसॉल्ट एव्हिएशनसोबत सोमवारी करार केला आहे. कंपनीने मिहानमध्ये जागा खरेदी केल्यानंतर तब्बल १४ महिन्यानंतर करार केला आहे, हे विशेष.२८ आॅगस्ट २०१५ ला रिलायन्स डिफेन्सचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनिल अंबानी यांनी नागपुरात संरक्षण उपकरणे आणि मशीनरीच्या निर्मितीसाठी मिहान-सेझमध्ये एअरोस्पेस पार्कची स्थापना करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. त्यावेळी अंबानी यांनी एक अब्ज डॉलर (६६०० कोटी रुपये) गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले होते. प्रारंभी कंपनीने एक हजार एकर जमिनीची मागणी केली होती. नंतर ही मागणी ३०० एकरवर आली आणि अखेर कंपनीने १०४ एकर जमिनीचे अधिग्रहण केले. त्यानंतर कंपनीतर्फे प्रकल्प स्थापनेसाठी कोणत्याही हालचाली न झाल्याने रिलायन्स एडीएजीने ही योजना थंडबस्त्यात टाकल्याची अफवा पसरली. या अनिश्चिततेच्या काळात सोमवारी अचानक कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक अनिल अंबानी व डसॉल्ट एव्हिएशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी ईरिक ट्रापिअर यांनी नवी दिल्लीत एका करारावर स्वाक्षरी केली. त्यामुळे प्रकल्प सुरू होणार असल्यावर शिक्कामोर्तब झाल्याने प्रत्येकाला आश्चर्याचा धक्का बसला. रिलायन्स डिफेन्सच्या सूत्राने नवी दिल्लीहून लोकमतशी बोलताना सांगितले की, केंद्र सरकारने २३ सप्टेंबर २०१६ ला ३६ लढाऊ विमाने खरेदीसाठी फ्रान्सच्या राफेल एव्हिएशनसोबत करार केला. हा करार ७.८७ अब्ज डॉलरचा (५९,००० कोटी रुपये) आहे. राफेल विमानाला लागणाऱ्या कच्चा माल आणि सुट्या भागांपैकी ५० टक्के माल भारतातील कंपनीकडून खरेदी करावा लागेल, असे करारात नमूद आहे. राफेल सात वर्षांत ही विमाने भारताला देणार आहे. या काळात राफेल लढाऊ विमानांसाठी २९,५०० कोटी रुपयांचा कच्चा माल आणि सुटे भाग भारतीय कंपनीकडून आयात करावे लागतील. डसॉल्ट एव्हिएशनसोबत झालेल्या कराराव्यतिरिक्त रिलायन्स डिफेन्सने ‘मात्रा बीएई डायनामिक एअरोस्पेस’सोबत (एमबीडीए) करार केला आहे. हवेतून हवेत आणि जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या मिसाईलची निर्मिती एमबीडीए करते. त्याच्या उत्पादनाचे युनिट मिहान-सेझमध्ये स्थापन होणार आहे. याशिवाय रिलायन्स डिफेन्सने विमानाचे इंजिन, रॉकेट आणि डिफेन्स इलेक्ट्रॉनिक्स सिस्टीमची निर्मिती करणाऱ्या फ्रान्सच्या सॅफरॉन एसए या कंपनीसोबत तसेच फ्रान्सच्या थेल्स समूहासोबतही करार केला आहे. करारांतर्गत रिलायन्स डिफेन्स पाणबुडी, पाणतीर, सोनार सेन्सार आदी गुजरातमध्ये पीपावाव पोर्टमध्ये निर्मिती करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. विमानाचे इंजिन वगळता वायुसेनेशी संबंधित प्रत्येक वस्तूंची निर्मिती मिहान-सेझमधील धीरूभाई अंबानी एअरोस्पेस पार्कमध्ये करण्याची रिलायन्स डिफेन्सची योजना आहे. या प्रकल्पांमुळे पार्कमध्ये जवळपास २५०० प्रत्यक्ष आणि १० हजार अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर रिलायन्स डिफेन्सचे राजेश ढिंगरा हे कराराला अंतिम स्वरूप देण्यासाठी मंगळवारी पॅरिसला रवाना झाले आहेत. यावर्षी जुलै महिन्यात ढिंगरा यांच्याशी लोकमतने संपर्क साधला होता. त्यावेळी नागपूर विमानतळ ते मिहान-सेझपर्यंत दुसरी धावपट्टी तयार नसल्यामुळे कंपनीने महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून (एमएडीसीने) पूर्ण जागेचा ताबा घेतला नव्हता. पण नागपूर विमानतळ ते मिहान-सेझदरम्यान टॅक्सी-वे असून एअर इंडियाची एमआरओ सुविधा तेथे अगोदरच कार्यरत असल्याचे एमएडीसीने स्पष्ट केले होते. तथापि, धावपट्टीचा मुद्दा बाजूला करीत कंपनीने अचानक प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय घेत सर्वांना अचंबित केले आहे. (प्रतिनिधी)
रिलायन्स डिफेन्स मिहान-सेझमध्ये तीन युनिट उभारणार
By admin | Published: October 05, 2016 3:08 AM