निशांत वानखेडे
नागपूर : उन्हाच्या झळा माणसांप्रमाणे मुक्या पक्ष्यांनाही बसत आहेत. त्यांच्याप्रती नागपूरकरांमध्येही संवेदना आहेत. म्हणूनच अनेकांच्या घरी पक्ष्यांसाठी घरटी व पाण्याची व्यवस्था केलेली दिसते. असा एक सामूहिक प्रयाेग सेवादल महिला महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी चालविला आहे. पाण्यासाठी मातीचे भांडे आणि स्वत: तयार केलेले घरटे लाेकांच्या घरी वितरित करण्यासह झाडे असलेल्या ठिकाणी लावण्याचे कामही या विद्यार्थिनी करीत आहेत.
प्रा. प्रवीण चरडे यांच्या मार्गदर्शनात गेल्या काही वर्षांपासून महाविद्यालयातर्फे हा प्रयाेग सुरू आहे. या माध्यमातून विद्यार्थिनी स्वत: लाकडाचे घरटे तयार करतात, मातीचे भांडे घेतात व ते लाेकांच्या घरी देतात. यावर्षीही या विद्यार्थिनींनी हा प्रयाेग चालविला आहे. प्रा. चरडे यांनी सांगितले, या विद्यार्थिनींनी मेडीकल, विद्यापीठाचा परिसर तसेच सिव्हील लाईन्सच्या परिसरात झाडांवर ही घरटी टांगली आहेत व मातीचे भांडे अडकविले आहेत. त्या भांड्यात पाणी आणि धान्य ठेवण्याचे कामही त्या करतात. गेल्या काही वर्षांत अनेक ठिकाणी यशस्वी प्रयाेग केल्याचे त्यांनी सांगितले.
रद्दी विकून निधी गाेळा
प्रा. चरडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दरवर्षी १ ते १० ऑक्टाेबरदरम्यान काॅलेजतर्फे वन्यजीव सप्ताह साजरा केला जाताे. या काळात काॅलेजचे प्राध्यापक व विद्यार्थिनी घरून रद्दी गाेळा करतात. त्यानंतर ती विकली जाते. त्यातून २० ते २५ हजार रुपयांचा निधी उभा केला जाताे. त्यातून लाकडे विकत आणून किंवा पडलेले गाेळा करून त्याद्वारे घरटी तयार केली जातात. मातीची भांडी घेतली जातात.
राजभवनात माेराचे रेस्टाॅरेंट
काॅलेजच्या एका प्रयाेगाअंतर्गत राजभवन येथे माेरासाठी रेस्टारेंट तयार करण्यात आले. दर महिन्याला १०० ते १५० किलाे धान्य गाेळा करून येथे दिले जाते. या रेस्टारेंटमध्ये इतर पक्ष्यांचीही मेजवानी हाेत आहे.
चिमण्यांसाठी विशेष प्रजनन प्रयाेग
काॅलेजचा सर्वात विशेष प्रयाेग चिमण्यांसाठीचा आहे. प्रा. चरडे यांनी सांगितले, काॅलेजच्या नरसाळा येथील वसतिगृहात ३०-४० घरटी लावण्यात आली. ही सर्व घरटी चिमण्यांच्या गर्दीने फुलली आहेत. या घरट्यांमध्ये चिमण्यांचे यशस्वी प्रजनन हाेत असून त्यांच्यावर अभ्यास केला जात आहे. सिंगापूरचा झुरांग पार्क व इजराईलमधील पार्कच्या धर्तीवर हा प्रयाेग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. यावर्षी पुन्हा १०० घरटी तयार करून पावसाळ्यात ती लावण्यात येणार असल्याचेही प्रा. चरडे यांनी स्पष्ट केले.