लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपुरात धडाक्यात सुरू असलेली रेमडेसिविरचा काळाबाजार थांबायला तयार नाही. पोलिसांनी आतापर्यंत ११ गुन्हे दाखल करून ३० पेक्षा जास्त आरोपींना अटक केली असली तरी अजूनही काळाबाजारी करणारे सक्रियच आहेत. प्रताप नगर पोलिसांनी अशाच प्रकारे सापळा रचून दोन वार्डबॉयसह तिघांना रविवारी रात्री अटक केली.
निखिल बळवंत डहाके (वय २६), दीपक श्रीराम महोबिया (वय २७) आणि संजय यादव (वय २७) अशी आरोपींची नावे आहेत. आरोपी महोबिया आणि यादव हे दोघे किंग्स हॉस्पिटलमध्ये वार्डबॉय असून, निखिल डहाके त्यांचा मित्र आहे. त्याच्या माध्यमातून आरोपी महोबिया आणि यादवने रेमडेसिविरचा काळा बाजार चालविला होता. निखिल डहाके नावाचा व्यक्ती ब्लॅकमध्ये रेमडेसिविर इंजेक्शन विकत असल्याची माहिती परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त नुरूल हसन यांना मिळाली होती. त्यावरून त्यांनी प्रताप नगर पोलिसांना कारवाईचे आदेश दिले.
त्यानुसार सापळा रचण्यात आला. सहायक पोलीस उपनिरीक्षक अनिल ब्राम्हणकर यांनी आरोपी निखिल डहाकेशी रविवारी दुपारी संपर्क साधून त्याला रेमडेसिविरबाबत विचारणा केली. त्याने ३० हजार रुपयांत एक इंजेक्शन मिळेल, असे सांगून रविवारी रात्री ७ च्या सुमारास ब्राम्हणकर यांना प्रताप नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिग बाजारच्या मागच्या गल्लीत बोलविले. तेथे पैसे घेऊन रेमडेसिविर इंजेक्शन त्याने पोलिसांच्या हातात ठेवले. त्याच वेळी त्याला पकडण्यात आले. पोलीस ठाण्यात आणून त्याची चौकशी केली असता, त्याने हे इंजेक्शन कामठी मार्गावर राहणाऱ्या आणि किंगस्वे हॉस्पिटलमध्ये वॉर्डबॉय असलेल्या दीपक महोबिया याने उपलब्ध करून दिल्याचे सांगितले. त्यामुळे मध्यरात्री प्रताप नगर पोलिसांचा ताफा दीपकच्या सदनिकेत धडकला. तेथे दीपकचा साथीदार संजय यादव याने पोलिसांची दिशाभूल करून परत पाठविण्याचा प्रयत्न केला; मात्र मोबाइल नंबरच्या लोकेशनवरून पोलिसांनी तेथेच त्याला हुडकून काढले. त्याला ठाण्यात आणल्यानंतर त्याने हे इंजेक्शन संजय यादव याच्या मदतीने मिळवल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांच्या पथकाने संजय यादव याला ताब्यात घेतले. पहाटे २.३० वाजेपर्यंत ही कारवाई चालली. सहायक पोलीस निरीक्षक पेठे यांनी ब्राह्मणकर यांच्या तक्रारीवरून आरोपी डहाके महोबिया आणि यादव या तिघांविरुद्ध विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला.
आरोपींची बनवाबनवी
पोलिसांनी पकडू नये म्हणून आरोपींनी बरीच खबरदारी घेतली होती. त्यामुळे प्रारंभी डहाकेने इंजेक्शन देण्यासाठी पोलिसांना रात्री ७ वाजतापासून तो ८.४५ वाजेपर्यंत इथे या, तिथे या, असे म्हणून बरेच फिरविले. शेवटी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकलाच.
----